कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून  ६६ वर्षीय इसमाचा खून


0
Views

कुंभारी येथे पैशाच्या व्यवहारातून 

६६ वर्षीय इसमाचा खून

4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोलापूर, दि. 28-वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी शिवारात पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून एका ६६ वर्षीय इसमास गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना आज सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेत दऱ्याप्पा गंगाराम काळे (वय ६६, रा. पारधी कॅम्प, कुंभारी) यांचा खून झाला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दऱ्याप्पा काळे हे त्यांची मुलगी राजश्री साळुखे यांच्यासोबत आरोपी निलेश अडगळे यांच्या शेतातील वस्तीवर गेले होते. यावेळी पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून आरोपींनी लोखंडी खोरे, कुऱ्हाड व लाकडी बॅटने दऱ्याप्पा काळे यांना मारहाण करून गंभीर दुखापत करून त्यांचा खून केला. तसेच फिर्यादी महिलेलाही लोखंडी फुकारीने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

याप्रकरणी गु.र.नं. ५९४/२०२६ अन्वये BNS कलम १०३(१), ११८(१), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी निलेश अडगळे, प्रकाश अडगळे, मुकेश अडगळे व श्रीदेवी अडगळे या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड, लोखंडी खोरे, लाकडी बॅट व लोखंडी फुकारी जप्त करण्यात आली आहे.

 

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी टाकणे, सपोनी राहुल डोंगरे, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे व पी एस आय कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर उप अधीक्षक कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी टाकणे हे करीत आहेत. सपोनि डोंगरे व वळसंग पोलीस ठाणे पोलीस पथकाने या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक केली घटनास्थळी परिस्थिती शांत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *