स्मशानात तृतीयपंथीयाने उचलले टोकाचे पाऊल 


0
Views

स्मशानात तृतीयपंथीयाने उचलले टोकाचे पाऊल 

सोलापूर, दि. 21- शहरातील होटगी रस्त्यावरील साखर कारखाना परिसरातील स्मशानभूमीत एका तृतीयपंथीयाने प्रेम संबंधातून झालेला छळ याला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी घडली. अभिजीत ऊर्फ कोमल हरिबा नागटिळक ( वय 22, राहणार साईनाथ नगर, साखर कारखान्याजवळ, होटगी रोड, सोलापूर ) असे त्या मृत तृतीयपंथीयाचे नाव आहे.

 

 

कोमल हिने स्मशानभूमीतील एका लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. त्यानंतर तिला खाली उतरवून तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

 

 

कोमल हिचे शुभम नावाच्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शुभम हा कोमलला वारंवार मारहाण करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. याला कंटाळून कोमलने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र यापूर्वी तिने शुभमला व्हिडीओ कॉलही केला होता, असे कोमलचे गुरू रोहिणी मोरे यांनी सांगितले.

 

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्य तृतीयपंथीयांची गर्दी 

कोमलच्या आत्महत्येनंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्य तृतीयपंथीयांनी मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अन्य एका तृतीयपंथीयाने प्रेम संबंधातूनच आत्महत्या केली होती. या घटनेला यानिमित्ताने उजाळा मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *