0
Views

विंचूर येथील आगीमध्ये तीन घरे जळून खाक
दागिने, रोकड जळून दहा लाखांची हानी
दक्षिण सोलापूर, दि.१२- तालुक्यातील विंचूर येथे मोलमजुरी करणाऱ्या तिघांच्या घराला अचानक लागलेल्या आगीमध्ये प्रापंचिक सामान, रोख रक्कम आणि दागिन्यासह सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मूळचे कुसूर येथील परंतु गेल्या 30 वर्षांपासून विंचूर येथे श्री पंचाक्षरी विद्या मंदिरसमोर पत्र्याचे शेड उभारून राहणाऱ्या देवकते कुटुंबीयांच्या घरांना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. घराला कुलूप लावून कुटुंबातील सर्वजण कामाला गेले होते. त्यामुळे आगीची लवकर कल्पना आली नाही. नंतर आग भडकत गेली तेव्हा परिसरातील लोक आग विजविण्यासाठी धावून आले. पोलीस यंत्रणेला आणि आग विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा मागविण्यात आली. गावातील बाबूशा बिराजदार यांच्याकडील पाण्याचा टँकरचाही वापर करण्यात आला. परंतु अग्निशामक यंत्रणा दाखल होईपर्यंत आगिने सरूबाई नागनाथ देवकते, मळसिद्ध नागनाथ देवकते आणि बिळेणी नागनाथ देवकते यांच्या पत्रा शेडच्या घराला विळखा घातला होता. सरुबाई देवकते यांच्या घरातील गॅस सिलिंडर टाकीचा स्फोट झाला. तेव्हा आग अधिकच भडकली. काही तरुणांनी धाडस दाखवून अन्य दोघांच्या घरातील गॅस सिलिंडरची टाकी सुरक्षितपणे बाहेर काढली. या आगीत देवकते कुटुंबीयांनी घरात ठेवलेले दीड लाख रुपये जळून खाक झाले. प्रत्येकी दीड तोळे सोन्याचे दागिनेही आगीच्या भक्षस्थानी पडले. प्रापंचिक साहित्य, धान्य, कपडे आधी जळून खाक झाले.
मंद्रूपचे पोलीस अधिकारी यांनी स्वतः आग विजविण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला. ग्राम महसूल अधिकारी सतीश भंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे. शासन स्तरावरून तसेच सामाजिक व सेवाभावी संस्थानी जळीतग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
















Leave a Reply