आहेरवाडीत युवकाचा धारदार शस्त्राने खून 


0
Views

मयत सचिन सासवे

आहेरवाडीत युवकाचा धारदार शस्त्राने खून

सोलापूर, दि. 21- दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका बावीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे.

 

सचिन अभिमान सासवे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे तर या प्रकरणी वळसंग पोलिसांनी धोंडीबा हनुमंत क्षेत्री आणि त्यांचा मुलगा आयुष्य धोंडीबा क्षेत्री (राहणार आहेरवाडी ) या बापलेकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सचिन हा शनिवारी रात्री त्याच्या शेतातील वस्तीवर झोपला होता. पहाटेच्या सुमारास सचिनच्या मानेवर, गळ्यावर आणि डोक्यावर गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. चुलत भावाने ही माहिती सचिनचे वडील अभिमान सासवे यांना दिली. यानंतर वडिलांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.

 

मयत सचिन सासवे याच्या अनैतिक संबंधाची धोंडीबा क्षेत्री यांच्याकडून सतत चर्चा होत असायची. त्यामुळे घटनेनंतर धोंडीबा आणि त्याचा मुलगा आयुष यांच्यावर पोलिसांचा संशय होता. खून झाल्याच्या आदल्या दिवशी धोंडीबा क्षेत्री हा कुऱ्हाड घेऊन फिरत असल्याचे परिसरात अनेकांनी पाहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *