पथनाट्यातून पेपरफुटी, अन्नभेसळ, स्त्री अत्याचारावर प्रहार 


0
Views

पथनाट्यातून पेपरफुटी, अन्नभेसळ, 

स्त्री अत्याचारावर प्रहार 

पथनाट्य स्पर्धेने युवा महोत्सवाने दुसरा दिवस गाजविला

बार्शी, दि. 29- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२व्या युवा महोत्सवातील पथनाट्य स्पर्धेने बार्शीतील महोत्सवाचा दुसरा दिवस अक्षरशः गाजवून सोडला. बार्शी महाविद्यालयाच्या परिसरातील मैदानावर सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत ४५ हून अधिक महाविद्यालयीन संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर थेट भाष्य केले. अभिनय, संवाद, संगीत आणि उपरोधिक मांडणीच्या माध्यमातून युवकांनी समाजातील ज्वलंत वास्तवावर प्रहार करीत जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

 

पेपरफुटीचे प्रकरण, जंतरमंतरवरील आंदोलन, खरात प्रकरण, स्त्री अत्याचार, जातीय व धार्मिक वाद, दहशतवाद, दलितांवरील अत्याचार, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या, सोशल मीडियाचे परिणाम अशा विविध विषयांना पथनाट्यांतून वाचा फोडण्यात आली. काही संघांनी आरक्षणाचा प्रश्न, भारतीय सैनिकांचे योगदान, दोन धर्मांमधील संघर्ष आणि सामाजिक विषमता यांसारख्या संवेदनशील विषयांवरही भाष्य केले. त्यामुळे मैदानावर सादर होणारे प्रत्येक पथनाट्य हे केवळ मनोरंजन न राहता सामाजिक प्रश्नांचा आरसा ठरले. मंगळवेढा येथील संत दामाजी महाविद्यालयाच्या संघाने ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा’ या शीर्षकाखाली देशाच्या वर्तमान सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या संघाने जातीयवाद, धार्मिक तेढ आणि स्त्री अत्याचार यांसारख्या प्रश्नांना आपल्या सादरीकरणातून हात घातला. सिंहगड महाविद्यालयाने भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि संघर्षाचे विविध पैलू मांडले.

 

वालचंद महाविद्यालयाने ‘आम्हाला भीक पाहिजे, सार्वभौम भारत पाहिजे’ या आशयाच्या सादरीकरणातून स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला यांच्या संघाने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत ग्रामीण जीवनातील वास्तव उपस्थितांसमोर आणले. दयानंद महाविद्यालय, लॉ कॉलेज यांच्यासह अन्य महाविद्यालयांच्या संघांनीही सामाजिक प्रश्नांना भिडणारी पथनाट्ये सादर केली. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजावर आधारित पथनाट्यानेही लक्ष वेधून घेतले. अन्न व दूध भेसळीसारख्या गंभीर प्रश्नांवर भाष्य करत युवकांनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित विषयांकडे लक्ष वेधले.

 

सोशल मीडियाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम, मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, स्त्री अत्याचार, जातीयवाद, धार्मिक संघर्ष, दहशतवाद, दलितांवरील अत्याचार, भारतीय सैनिक, महागाई आणि बेरोजगारी अशा अनेक ज्वलंत विषयांभोवती पथनाट्यांची गुंफण करण्यात आली. युवक कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रश्न उपस्थित केले, प्रेक्षकांना अंतर्मुख केले आणि सामाजिक परिवर्तनाची गरज अधोरेखित केली. दिवसभर सुरू असलेल्या या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक रंगमंचाच्या चौकटीबाहेर येत रस्त्यावर, मैदानावर आणि थेट प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या या पथनाट्यांनी युवकांच्या कलात्मकतेसोबतच त्यांच्या सामाजिक भानाचीही प्रचिती दिली. त्यामुळे युवा महोत्सवातील पथनाट्य स्पर्धा हा दुसऱ्या दिवसाचा विशेष आकर्षणबिंदू ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *