0
Views

बलदवा हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा
कर्मवीर जयंतीदिनी गौरव
रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरचा उपक्रम
सोलापूर, दि. 23- रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर आणि जिल्हा रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘जुग जुग जियो’ अवयवदान जनजागृती अभियानांतर्गत, कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध, पोस्टर आदी स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धांमध्ये सौ. गोपीबाई रामकिसन (पापाशेठ) बलदवा हायस्कूल, देगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
वक्तृत्व स्पर्धेत राम हरी गायकवाड याने प्रथम, योगिता रविकांत काळे हिने द्वितीय तर रुतिका संजय पवार हिने तृतीय क्रमांक मिळविला. निबंध स्पर्धेत साक्षी भास्कर तोरणे हिने प्रथम, श्रेयश गंगाधर कांबळे याने द्वितीय तर सुहाना कासिम शेख हिने तृतीय क्रमांक पटकावला. मायावती समाधान गायकवाड व अर्पिता संतोष पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
या संपूर्ण स्पर्धा उपक्रमासाठी बलदवा हायस्कूलच्या शिक्षिका शीला सुजित हावळे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि आवश्यक समन्वय साधत त्यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगदान दिले.
कार्यक्रमात ‘Nation Builder – राष्ट्रशिल्पकार’ या संकल्पनेअंतर्गत गुणवंत प्राध्यापक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. स्वप्नशील अशोक लांबतुरे, डेप्युटी पर्सोनेल एक्झिक्युटिव्ह (ह्युमन रिसोर्सेस) यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. अवयवदान हा संवेदनशील आणि जीवनदायी विषय असून अशा उपक्रमातून समाजात व्यापक जनजागृती निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. नयना व्यवहारे, सचिव रोहन तमशेट्टी, डॉ. राजकुमार भैरप्पा, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सभासद तसेच जिल्हा रुग्णालयाचे नेत्रदान जिल्हा समन्वयक विकास लिंगराज यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते.
‘जुग जुग जियो’ या अभियानाच्या माध्यमातून अवयवदानाबाबत समाजात सकारात्मक जनजागृती करण्याचा रोटरी क्लब आणि जिल्हा रुग्णालयाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. अवयवदान म्हणजे मृत्यू नाही, तर अमरत्व आहे, या संदेशातून मानवतेची आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.















Leave a Reply