तंजावरमध्ये पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांचा  ‘मराठा समाज भूषण’ पुरस्काराने गौरव


0
Views

तंजावरमध्ये पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांचा 

‘मराठा समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

सोलापूर, दि. 26- तमिळनाडूतील ऐतिहासिक नगरी तंजावरमध्ये सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना मानाच्या ‘सरफोजीराजे भोसले मराठा समाज भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात हा सन्मान सोहळा झाला. तंजावर संस्थानचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

याप्रसंगी बोलताना छत्रपती बाबाजीराजे भोसले म्हणाले, पत्रकार हा समाजाला जोडणारा दुवा असतो. चव्हाण यांना दिलेला हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून मराठी आणि तमिळ या दोन संस्कृतींना जोडणारा सेतू आहे. त्यांच्या लेखणीतून तंजावरच्या मराठा इतिहासाची ओळख महाराष्ट्राच्या नव्या पिढीला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

या संमेलनाचे उदघाटन परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे यांनी दीपप्रज्वलन करून केले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद गोरे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले, तर माजी मंत्री प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे स्वागताध्यक्ष होते. तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले यांनी निमंत्रकाची जबाबदारी सांभाळली. श्रीमंत छत्रपती आबाजीराजे भोसले यावेळी उपस्थित होते.

 

केरळ प्रदेशाध्यक्षा डॉ. अश्विनी भगत, ऍड. सुधीर चव्हाण, रंजनादेवी भोइटे, शुभांगी काळभोर, रवींद्र पाटील यांच्यासह देशभरातील साहित्यिक उपस्थित होते.

 

पत्रकारितेबरोबरच चव्हाण यांचे सामाजिक कार्यही उल्लेखनीय आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गरजू रुग्णांना मदत मिळवून देणे, मूळगाव शिरापूर (मोहोळ) येथे पाझर तलावासाठी पाठपुरावा करणे आणि बालाजी अमाईन्सच्या सीएसआर निधीतून गावात आधुनिक स्मशानभूमी उभारणे, या कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम मालन यांनी केले, तर अमोल कुंभार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *