जागतिक पर्यटन दिनानिमित्त  भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी


0
Views

जागतिक पर्यटन दिनानिमित्त 

भालेवाडी येथे अभ्यास दौरा यशस्वी

सोलापूर, दि. 29 – जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजित सोलापूर पर्यटन सप्ताहाच्या अनुषंगाने दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘मध, कृषी व ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती, कोळे’ (ता. सांगोला) यांच्या वतीने एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत विकसित होत असलेल्या ‘मिल्क अँड मिलेट व्हिलेज, भालेवाडी’ (ता. मंगळवेढा) येथे अभ्यासात्मक पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

ग्रामीण व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच विविध गावांमध्ये विकसित होत असलेल्या पर्यटन संकल्पनांचा अभ्यास करून त्या आपल्या गावात राबविण्याच्या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास प्रायमुव्ह, पुणे यांचे तांत्रिक सहाय्य लाभत आहे.

 

 

या दौऱ्यात सहभागी प्रतिनिधींनी भालेवाडी येथील आदर्श गोठे, ऐतिहासिक मामाचा वाडा, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे, पुरातन आड, जिल्हा परिषद शाळा, सेंद्रिय परसबागा, देशी वृक्षांची रोपवाटिका, पर्यटन पायाभूत सुविधांची कामे तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आदर्श स्मशानभूमी यांची प्रत्यक्ष पाहणी केली.

 

 

यावेळी भालेवाडी पर्यटन समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत दवले, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय गायकवाड, पर्यटन मार्गदर्शक नानासाहेब रोंगे तसेच पर्यटन समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यांनी भालेवाडीमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध पर्यटन उपक्रमांची माहिती सहभागी प्रतिनिधींना दिली. पाहणी दौऱ्यानंतर स्थानिक शेतकरी, पर्यटन समितीचे सदस्य व महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला. यावेळी कृषी, दुग्ध व्यवसाय, भरडधान्य उत्पादन, स्थानिक संस्कृती व ग्रामीण पर्यटनाची सांगड घालून शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

 

भालेवाडी येथे विकसित होत असलेल्या विविध पर्यटन उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील स्थानिक संसाधनांना पर्यटनाशी जोडण्याची प्रभावी संधी निर्माण झाली असून, कोळे गावात मध उत्पादन, कृषी व स्थानिक ऐतिहासिक वारशाची सांगड घालून ग्रामीण पर्यटन विकसित करण्यासाठी हा अभ्यास दौरा अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असे मत कोळे येथील पर्यटन समितीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.

 

  1. थीम बेस्ड पर्यटन गावे
    सोलापूर जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध ‘थीम बेस्ड पर्यटन गावे’ विकसित करण्याच्या उपक्रमाला अशा अभ्यास दौऱ्यांमुळे चालना मिळत असून, गावागावातील स्थानिक वैशिष्ट्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार व शाश्वत विकासाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *