कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर


0
Views

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना

‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

सोलापूर, दि. 22-पुण्यातील लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, पुणे यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र भारती यांनी सांगितले.

 

 

महेंद्रनाथ भारती यांचे वडील लोकशिक्षक बाबा भारती हे मुळचे ईश्वरपूर (इस्लामपूर)जि. सांगली येथील होते. त्यांनी 30 वर्षे ईश्वरपूरमध्ये लोकशिक्षक म्हणून काम केले. त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा सहवास लाभला होता. त्यांनी पाली – मराठी पहिला शब्दकोश निर्माण केला.

 

 

लोकशिक्षक बाबा भारतीच्या म्हणजे आपल्या वडिलांच्या कार्याचे स्मरण म्हणून त्यांचे सुपुत्र विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवतात. त्यातील एक म्हणजे समाजात आपले अनमोल योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने “लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार ” देऊन सन्मानीत केले जाते.

 

 

कुलगुरू यांना नुकताच एन. सी. सी. कडून ‘कर्नल’ हा सन्मान्य दर्जा बहाल झाला आहे. तसेच कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आत्तापर्यंत शैक्षणिक, प्रशासकीय आणि संशोधनात्मक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता ‘ अहिल्याभवन’, अधिसभा सभागृह, नूतन प्रशासकीय इमारत येथे डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रदान करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार अनेक गणमान्य व्यक्तींना प्राप्त झाला आहे.

 

या पुरस्कार वितरण समारंभास प्र – कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र- कुलसचिव डॉ. अतुल लकडे, महेंद्र भारती, पुरुषोत्तम सदाफुले, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या समारंभास विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, संकुल संचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, समन्वयक पुरुषोत्तम सदाफुले, रवींद्र भारती, निमंत्रक प्रकाश कांबळे, निमिश भारती आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *