प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे ‘कमांडंट गोल्ड मेडल’ने सन्मानित 


0
Views

प्रा. डॉ. सुनेत्रा ढेरे ‘कमांडंट गोल्ड मेडल’ने सन्मानित 

सोलापूर, दि. २६ – सध्या देवगड येथे कार्यरत मूळ सोलापूरच्या डॉ. सुनेत्रा लक्ष्मण ढेरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५८ महाराष्ट्र बटालियनचे प्रतिनिधित्व करत एन. सी. सी. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, ग्वाल्हेर येथे पार पडलेल्या रिफ्रेशर कोर्समध्ये गुणवत्ता यादीत देशात प्रथम क्रमांक पटकावून ‘कमांडंट गोल्ड मेडल’ मिळवले आहे.

 

३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण कोर्समध्ये देशभरातून तब्बल ११७ एन.सी.सी. अधिकारी सहभागी झाले होते. या कोर्समध्ये आपत्ती व्यवस्थापन, मॅप रीडिंग, रायफल ड्रिल अशा विविध विषयांचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक अभ्यास करून घेण्यात आले. लेफ्टनंट सुनेत्रा यांनी केवळ एकूण गुणवत्ता यादीतच प्रथम स्थान मिळवले नाही, तर त्यांनी आपल्या अष्टपैलू कामगिरीची छाप पाडत रायफल शुटिंग, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी मध्येही उत्कृष्टता दाखवली. एन. सी. सी. अधिकारी होण्यासाठी २०२० मध्ये त्यांनी ग्वाल्हेर येथे तीन महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करत पूर्व कमिशन प्रमाणपत्र मिळवून आर्मी मधील लेफ्टनंट रँक प्राप्त केली होती. सदर कोर्स नंतर लेफ्ट. सुनेत्रा यांना नजिकच्या काळात कॅप्टन रँक प्रदान करण्यात येणार आहे. हे दैदिप्यमान यश त्यांचे प्रामाणिक परिश्रम आणि योग्यता यांची साक्ष देते.

वडील लक्ष्मण, आई मीना ढेरे यांचेकडून तसेच ज्ञान प्रबोधिनी प्रशालेमधून लहानपणापासून मिळालेल्या योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि संस्कारांचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. सध्या त्या देवगड महाविद्यालयात फिजिक्स विभागामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण ज्ञान प्रबोधिनी (दहावीपर्यंत), वालचंद कॉलेज (बारावीपर्यंत) आणि संगमेश्वर कॉलेज (बी. एस्सी.) सोलापूर येथे झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *