0
Views

पद्माकर देव पुरस्कार अभिनेत्री फैयाज
यांना प्रदान करण्यात येणार
सोलापूर, दि. 22- शिक्षण, अभिनय आणि संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करणाऱ्या पद्माकर देव पुरस्काराचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. यावर्षीचा देव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैयाज यांना प्रदान करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी फडकुले सभागृह, सोलापूर येथे सायंकाळी ५:३० वाजता हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
फैयाज या ह. दे. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी असून, सोलापूरच्या सांस्कृतिक वातावरणातून त्यांच्या कलाप्रवासाला आकार मिळाला. अभिनय आणि संगीत क्षेत्रात आपल्या प्रतिभेची स्वतंत्र ओळख निर्माण करत त्यांनी दीर्घकाळ रसिकांचे मनोरंजन केले आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांत फैयाज यांनी आपल्या अभिनयाची प्रभावी छाप उमटवली आहे. रंगभूमीवरील अभिनयासोबतच दूरदर्शनवरील मालिका आणि चित्रपटांमधील त्यांच्या विविधांगी भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या आहेत. अभिनयाबरोबरच गायन आणि संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे.
सोलापूरच्या मातीतून घडलेल्या आणि ह. दे. प्रशालेच्या विद्यार्थिनी म्हणून कलाक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या फैयाज यांना त्यांचे गुरू पद्माकर देव यांच्या नावाने असलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणे हा वेगळा योग आहे. तसेच सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठीही अभिमानाचा क्षण आहे. देव पुरस्काराच्या मागील चौदा वर्षांच्या वाटचालीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. यापूर्वी आनंद भाटे, डॉ. मोहन आगाशे, जया भांगे, अच्युत गोडबोले, सुलभा पिशवीकर इत्यादी मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देव पुरस्काराच्या पंधराव्या वर्षी फैयाज यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाचा होणारा हा गौरव सोलापूरच्या कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर फैयाज यांची मुलाखत होणार आहे. रंगकर्मी अमोल धाबळे मुलाखत घेतील.















Leave a Reply