0
Views

श्री मार्कंडेय रुग्णालयाच्या प्रेसिडेंटपदी
सत्यनारायण बोल्ली यांची फेरनिवड
सोलापूर, दि. 27- श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी सत्यनारायण बोल्ली यांची पुन्हा एकदा प्रेसिडेंटपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर महापौर विनायक कोंड्याल, चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, व्हाईस चेअरमन राजेशम येमूल तसेच पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल, मुरलीधर अरकाल आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
रुग्णालयाच्या ६० व्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर सभासदांनी प्रश्न उपस्थित करत रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. यामध्ये आयव्हीएफ उपचार केंद्र, पोटनियम दुरुस्ती, कामगारांचे आंदोलन तसेच डॉक्टरांना दिले जाणारे मानधन या विषयांवर चर्चा झाली.
आयव्हीएफ उपचारासाठी डॉ. अमेय माणिक गुर्रम यांच्या निवडीबाबत तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनाबाबत काही सभासदांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांना देण्यात येणारे मानधन बंद करून इतर डॉक्टरांप्रमाणे कमिशन बेसवर नियुक्ती करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.
नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अमित पोरेडी यांच्या कायमस्वरूपी मानधनाचा मुद्दाही सभासदांनी प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्यासमोर मांडला. याबाबत चेअरमन, डॉ. विजयकुमार अरकाल व इतर संचालकांसोबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
यानंतर प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयातील एका कक्षात बैठक घेण्यात आली. यावेळी रामकृष्ण कोंड्याल, सुरेश फलमारी, काशिनाथ गड्डम, अमृतदत्त चिन्नी, व्यंकटेश दोंता, श्रीधर चिट्याल, रमेश कैरमकोंडा, हरिदास पोटाबत्ती, अँड श्रीनिवास क्यातम,किसन श्रीराम, अँड प्रकाश जन्नू आदींनी रुग्णालयातील कारभाराबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. यावर रुग्णालयाच्या कामकाजाकडे जातीने लक्ष देण्याचे आश्वासन प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी दिले.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची माहिती तळमजल्यावर आणि दर्शनी भागात लावण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावर योजनेची माहिती नागरिकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावण्यात येईल, असे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी सांगितले.
















Leave a Reply