0
Views

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची
वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
सोलापूर, दि. 28- सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज सोमवार दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जयकुमारजी पाटील उद्योग भवन, चिंचोळी एम.आय.डी.सी. येथे उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस असोसिएशनच्या १७ नवीन सभासदांचे स्वागत असोसिएशनचे अध्यक्ष डी राम रेड्डी यांच्याकडून करण्यात आले. तसेच एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड, उपअभियंता प्रदीप खंदारे, फायर ब्रिगेडचे उपअधिकारी रमेश शिंदे आणि महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती माशाळ यांचेही स्वागत करण्यात आले.
असोसिएशनचे सचिव वासुदेव बंग यांनी प्रास्ताविकातून गेल्या वर्षभरात असोसिएशनमार्फत करण्यात आलेल्या विविध कामांचा व उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी असोसिएट सभासदांची व्याख्या, त्यांचे हक्क व मर्यादा याबाबत सभासदांना सविस्तर माहिती दिली. एकूण प्रिन्सिपल सभासदांच्या तुलनेत असोसिएट सभासदांची संख्या जास्तीत जास्त १० टक्के ठेवण्याचा ठराव सभासदांच्या संमतीने मंजूर करण्यात आला.
तसेच सेकंडरी(दुय्यम) सभासदांची व्याख्या, असोसिएशनकडून साहाय्य मिळविण्यासाठी त्यांची पात्रता व लागू असलेल्या अटी याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील ठराव सभासदांच्या संमतीने मंजूर करण्यात आला.
यापुढे कार्यकारी समितीच्या सदस्यांनी कार्यकारी सदस्य म्हणून कायम राहण्यासाठी त्यांच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात कार्यकारी समितीच्या बैठकींमध्ये किमान ५० टक्के उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्याचा ठराव ही पारीत करण्यात आला. ही अट पूर्ण न करणारे सदस्य आगामी निवडणुकीत कार्यकारी समितीच्या सदस्यपदासाठी उमेदवारी भरण्यास पात्र राहणार नाहीत, असा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला.
असोसिएशनचे खजिनदार सप्रेम कोठारी यांनी वार्षिक आर्थिक हिशोबांचे सादरीकरण केले. तसेच आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी असोसिएशनचे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून धनराज नोगजा यांची नियुक्ती सर्वानुमते मंजूर करण्यात आली. असोसिएशनच्या नवीन इमारतीसाठी देणगी देणाऱ्या सर्व सभासदांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात असोसिएशनचे अध्यक्ष डी. राम रेड्डी यांनी आगामी काळात असोसिएशनमार्फत हाती घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. असोसिएशनच्या जागेत सभासद व त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा सुविधा, क्लब हाऊस, रेस्टॉरंट तसेच पाहुण्यांच्या निवासासाठी ८ ते १० खोल्यांसह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या प्रस्तावास उपस्थित सभासदांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यास मंजुरी दिली.
चिंचोळी एम.आय.डी.सी. परिसरातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठा व ट्रिपिंगच्या समस्या, स्ट्रीट लाईटची समस्या तसेच औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नांबाबत असोसिएशनमार्फत सातत्याने करण्यात येत असलेल्या पाठपुराव्याची माहितीही रेड्डी यांनी सभासदांना दिली.
सोलापूरची विमानसेवा पुन्हा सुरू होण्याबाबत तसेच नियोजित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे भविष्यात सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मिळणाऱ्या संधींबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) प्रोत्साहन देण्यासाठी आगामी काळात असोसिएशनमार्फत विविध पुरस्कार देण्यात येणार असल्याची संकल्पना त्यांनी विषद केली.
एम.आय.डी.सी. विभागाकडून उद्योजकांना उपलब्ध असलेल्या विविध ऑनलाइन सेवांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सेमिनार आयोजित करण्याची विनंती असोसिएशनमार्फत करण्यात आली असून, यामुळे उद्योजकांना अधिकृत ऑनलाइन प्रक्रियेची माहिती मिळून मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच सभासदांनी असोसिएशनमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सेमिनार, प्रशिक्षण कार्यशाळा आणि विविध बैठकींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्ष डी. राम रेड्डी यांनी केले. असोसिएशनच्या विविध उपक्रमांना सभासदांकडून मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
यानंतर टाटा पॉवर सोलरचे विभागीय सेल्स मॅनेजर यांनी उपस्थित सभासदांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे फायदे, शासनाच्या विविध योजना व धोरणे तसेच भविष्यातील ऊर्जा गरजा याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर एज बिझनेस सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या विविध सेवांबाबत उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश सुत्रावे, खजिनदार सप्रेम कोठारी, सहसचिव अभिषेक तापडिया, शिवशंकर आंधळकर, माजी अध्यक्ष व कार्यकारी सदस्य शरदकृष्ण ठाकरे, कार्यकारी सदस्य सिद्धाराम चिट्टे, कमलेश शहा, रामेश्वरी गायकवाड, तारासिंग राठोड, जयपाल महिंद्रकर, विक्रम बंडेवार यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक व सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असोसिएशनचे व्यवस्थापक शुद्धोधन गायकवाड यांनी केले, तर आभार सहसचिव शिवशंकर आंधळकर यांनी मानले.
















Leave a Reply