रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना  माणुसकीचा धडा शिकवते : डॉ. खेडकर 


0
Views

रयत शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना 

माणुसकीचा धडा शिकवते : डॉ. खेडकर 

बलदवा हायस्कुलमध्ये कर्मवीर जयंती सोहळा 

सोलापूर, दि. 24- रयत शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना माणुसकीचा संस्कार शिकवते. त्यामुळे आजही रयत शिक्षण संस्थेकडे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा कायम असल्याचे गौरवोद्गार एन बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डॉक्टर यशपाल खेडकर यांनी आज गुरुवारी काढले.

 

 

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 139 वा जयंती सोहळा देगाव तालुका उत्तर सोलापूर येथील सौ. गोपीबाई रामकिसन ( पापाशेठ ) बलदवा हायस्कुल येथे साजरा करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी प्रगती मंडल, महिला शाखा सोलापूरच्या अध्यक्ष स्नेहा सोनी, अंजली बलदवा, स्थानिक स्कुल कमिटी सदस्य विश्वनाथ कराळे, सोमराज गायकवाड, बाळासाहेब जकापुरे, भीम दांडगे, शरद भोईटे, शाळेच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका शिंदे मॅडम आदींची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य रामचंद्र जाधव हे होते.

 

 

 

डॉक्टर यशपाल खेडकर पुढे म्हणाले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकडे गावची पाटीलकी होती. त्यांनी ठरवले असते तर ते विलासी जीवन जगू शकले असते. मात्र कर्मवीरांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाचे व्रत स्वीकारले. जिथे एसटी जात नाही तिथे त्यांनी शाळा काढल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत आपल्या शिक्षण संस्थेला रयत शिक्षण संस्था हे नाव दिले. ते उत्तम पद्धतीचे प्रभावी वक्ते होते, त्याचबरोबर उत्तम कलाकारही होते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

स्नेहा सोनी म्हणाल्या की शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे तर शिक्षणातून माणसाला विचार करण्याची क्षमता मिळते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत व ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. चुका होतील म्हणून घाबरून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा तसेच शिक्षकांचा आदर केलाच पाहिजे. वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. मोबाईलचा गरजेपुरता वापर करून त्याचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग केला पाहिजे. त्याचबरोबर अभ्यासासह जीवनात खेळही महत्त्वाचा असून खेळामुळे आरोग्य चांगले राहते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

सुरुवातीला प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक वाय. एस माळी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थांचा रोख रक्कम, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका राखी राठोड आणि स्मृती चवरे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. हावळे, किशोर मार्तंडे सर, दत्ता पारडे सर , जाधव सर, मोरे सर, कुचेकर सर, सेवक पवार यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *