0
Views

कोल्ह्याचे प्रातीनिधीक छायाचित्र
कोल्ह्याचा लहान मुलीवर हल्ला
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र प्राण्यांचे हल्ले वाढले
जळगाव, दि. 5- सातपुड्याच्या पायथ्याशी राहत असलेल्या आदिवासी लोकांवर हिंस्र प्राण्यांचे हल्ले होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या घटनेनंतर गुरुवारच्या दिवशी एका लहान मुलीवर कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत मुलीच्या कुटुंबातील मोठी माणसं वेळीच धावून आल्याने त्या मुलीचा जीव वाचला तर या झटापटीत कोल्ह्याचा जागीच मृत्यू झाला.
चोपडा तालुक्यातील शेवरी पाडा येथे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या घटनेत समरिता रितेश बारेला (वय 3) ही मुलगी तसेच तिला वाचवणारे कुटुंबातील धनसिंग नुरा बारेला ( वय 40) आणि लोका हिरामण बारेला (वय 30) हे जखमी झाले आहेत.
जखमी मुलगी बाहेर जात असताना कोल्ह्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. कोल्हा तिला ओढून नेण्याच्या प्रयत्न करत होता. दरम्यान मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने कुटुंबातील दोघेजण बाहेर आले. त्यांनी कोल्ह्याला पाहताच मोठ्या धैर्याने त्याच्याशी झटापट करून मुलीची सुटका केली. यात ते दोघेही जखमी झाले तर कोल्ह्याला दाबून धरल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींची मदत केली व त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
25 ऑगस्टला 4 अस्वलांचा हल्ला
येथील आदिवासींवर हिंस प्राण्यांचा हल्ला होण्याची ही गेल्या दहा दिवसातील दुसरी घटना आहे. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी बढई पाडा तालुका चोपडा येथे शेतात काम करत असलेल्या दोघांवर चार अस्वलांनी मिळून हल्ला केला होता. त्यानंतर आता शेवडे पाडा येथे कोल्ह्याने लहान मुलीवर हल्ला केल्याने आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
















Leave a Reply