तुम्हाला माहित आहे ! जगभरातील  80 टक्के गेंडे भारतात आढळतात 


0
Views

तुम्हाला माहित आहे ! जगभरातील 

80 टक्के गेंडे भारतात आढळतात 

गुवाहाटी, दि. 17- जगभरात सुमारे 4,075 एकशिंगी गेंडे असल्याचा अंदाज आहे. त्यातील 80 टक्के गेंडे भारतात तेही आसाममध्ये आढळतात. आसाममधील या एकशिंगी गेंड्यांची संख्या 3260 इतकी झाली असल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिली. आसाममध्ये नुकतीच नवीन गणना करण्यात आली त्यात गेंड्यांची संख्या 3260 इतकी आढळून आली आहे.

 ‘या’मुळे गेंड्यांची संख्या वाढण्यास झाली मदत

 गेंड्यांच्या संवर्धनासाठी शिकारीला आळा घालणे, त्यांची संरक्षण व्यवस्था मजबूत करणे आणि त्यांच्या अधिवासाचे जतन करणे यावर आसाम सरकारने भर दिला आहे. त्यामुळे आसाम राज्यातील एकशिंगी गेंड्यांची संख्या वाढण्यास मदत झाल्याचे मानले जाते. 2025 मध्ये आसाममध्ये गेंड्यांच्या शिकारीची एकही घटना नोंदवली गेली नाही हे विशेष. गेंड्याच्या शिंगापासून वन औषधी तयार करता येते या गैरसमजातून गेंड्यांची शिकार केली जाते.

गेंड्याची वास घेण्याची क्षमता प्रचंड 

या एकशिंगी गेंड्याला भारतीय गेंडा असेही म्हणतात. या गेंड्याचे शिंग माणसाच्या नख आणि केसांप्रमाणे वाढतच राहते. गेंड्याचे वजन साधारणपणे अडीच हजार किलो इतके असते. इतके वजन असूनही प्रसंगी गेंडा ताशी 30 किलोमीटर वेगाने धावू शकतो. गेंडे हे शुद्ध शाकाहारी असून गवत हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. पाणी आणि चिखलात त्यांना बसून राहणे आवडते. गेंड्याची वास घेण्याची क्षमता प्रचंड जास्त असते. पण त्यांना कमी दिसते. गेंडा हा आसामचा राज्य प्राणी आहे. आसाम व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्येही गेंडे आढळून आल्याची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *