0
Views

४० फूट खोल विहिरीत पडलेल्या
घोणस सापाला दिले जीवदान
वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे परिश्रम
सोलापूर, दि.17 – वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन सदस्यांच्या अथक परिश्रमामुळे ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या घोणस सापाला जीवदान मिळाल्याची घटना आज गुरुवारी घडली.
आज सकाळी 11 वाजता संतोष नगर बाळे येथील शेतकरी पावले यांच्या ४० फूट खोल विहिरीमध्ये एक महिन्यापासून एक साप पडल्याची माहिती निखिल दारिगोल व प्रकाश अवताडे यांनी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य सुरेश क्षिरसागर यांना दिली. या अनुषंगाने सुरेश क्षीरसागर आपल्या अन्य सहकाऱ्यासमवेत संतोष नगरात गेले असता त्यांना ४० फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये एक घोणस जातीचा साधारण साडे तीन फुट लांबीचा विषारी साप आढळून आला. ती विहीर दगडाने बांधलेली व विहिरीत जाण्यासाठी पायऱ्या होत्या पण विहीर अर्धवट ढासळलेली होती. त्यामुळे खाली उतरता येत नव्हते.
कुठलीही साधनसामग्री सोबत नसताना शेजारी असलेले शेतकरी रेवण कांबळे यांच्या कडून एक दोरी मागवण्यात आली व सुरेश क्षीरसागर यांच्या कमरेला दोरी बांधून ते विहीरीत उतरले. त्यांनी एका स्नेक स्टिकच्या सह्याने अथक परिश्रमानंतर त्या घोणस प्रजातीच्या विषारी सापाला विहीरितून यशस्वीपणे वर काढले. त्यानंतर या सापाला लगेच जवळच त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पुन्हा सोडून देण्यात आले.
या बचावकार्यासाठी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सुरेश क्षिरसागर, लखन भोगे, प्रवीण गावडे, विकी चराटे, राहुल दोरकर, गुरु चराटे, शेतकरी रेवन कांबळे यांनी परिश्रम घेतले.
















Leave a Reply