समोर वाघ पाहून गुराख्याने प्रसंगावधान राखत मृत्यूला दिली हुलकावणी 


0
Views

समोर वाघ पाहून गुराख्याने प्रसंगावधान

राखत मृत्यूला दिली हुलकावणी 

गडचिरोली, दि. 14- नेहमीप्रमाणे जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याने समोरून वाघ येत असल्याचे पाहताच प्रसंगावधान राखून साक्षात मृत्यूलाच हुलकावणी दिल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यातील मरपल्ली येथे घडली.

 

 

 

एटापल्ली तालुक्यातील मरपल्ली येथील महेंद्र भाऊजी दुर्वा हा 23 वर्षीय गुरे राखणारा युवक नेहमीप्रमाणे शनिवारी गावातील अन्य महिलांसोबत शेतालगत गुरे चारण्यासाठी गेला होता. गुरे चालत असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्याला अचानक समोरून वाघ येत असल्याचे दिसले. यानंतर त्याने प्रसंगावधान ओळखून न घाबरता धैर्याने जवळच्या झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. बराच वेळ झाला तरी आपल्या सोबत आलेला महेंद्र अजून का येत नाही म्हणून सोबत आलेल्या महिलांनी त्याला जोरजोरात हाका मारल्या. मात्र वाघाच्या भीतीने झाडावर चढून बसलेल्या महेंद्रने त्यांना कसलाच प्रतिसाद दिला नाही कारण झाडाखाली वाघ उभा होता. यानंतर सर्व महिला गावात आल्या व त्यांनी महेंद्र आपल्यासोबत परत आला नसल्याची माहिती ग्रामस्थांना सांगितली. यामुळे रविवारी पहाटे पाच वाजता 85 गावकरी त्याला जंगलात शोधायला गेले. इकडे दुपारी चार वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत महेंद्र चढलेल्या झाडाखालीच वाघ उभा होता तो निघून गेल्यानंतर महेंद्र सकाळी सहा वाजता सुखरूप पुन्हा गावात परतला. यानंतर त्याने मृत्यूच्या जबड्यातून आपण कसे बचावलो याची आपबीती गावकऱ्यांना सांगितली. बाका प्रसंग असतानाही महेंद्रने दाखवलेल्या धाडसाचे गावकऱ्यांनी मोठे कौतुक केले. तसेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती अशीच चर्चा सर्वत्र रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *