0
Views

बटरफ्लाय वॉकमधून उलगडले फुलपाखरांचे सौंदर्य
वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन सोलापूरचा उपक्रम
सोलापूर, दि. 13- बिग बटरफ्लाय मंथनिमित्त वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशन, सोलापूर तर्फे आज रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत “बटरफ्लाय वॉक” हा एक आगळावेगळा उपक्रम श्री सिद्धेश्वर वनविहार, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे हे 4 थे यशस्वी वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवानंद हिरेमठ यांनी आजच्या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच पक्षीतज्ञ निनाद शहा यांनी सिद्धेश्वर वनविहारातील जैवविविधतेविषयी आपले अनुभव कथन केले. यानंतर उपस्थित वन्यजीवप्रेमींचे विविध गटांमध्ये विभाजन करण्यात आले. अजित चौहान, सचिन पाटील, संतोष धाकपाडे यांनी प्रत्येकी एका ग्रुपचे प्रतिनिधित्व केले. प्रातःकाळ असल्याने पर्यावरणप्रेमींना अनेक फुलपाखरांचे दर्शन झाले. यावेळी चिमुकल्या पर्यावरणप्रेमीची भिरभिरणाऱ्या फुलपाखरांची छबी मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लगभग सुरू होती. इतकी सारी फुलपाखरे एकाच ठिकाणी, एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या उत्साहाला पारावर राहिला नव्हता. यावेळी अनेकांनी फुलपाखरांची नावे व संख्या नोंद करून घेतली. यात व्हाईट ऑरेंज टीप, यल्लो ऑरेंज टीप, कॉमन गल, कॉमन रोझ, क्रीम्सन रोझ, कॉमन रेड फ्लॅश, लार्ज सालोमन अरब, ग्रेट एगफ्लाय, कॉमन एमिग्रँट, कॉमन ग्रास यल्लो, अँगल्ड कास्टर, कॉमन पेरिओट, कॉमन सिल्व्हरलाईन, सायके, पायोनिअर इ. २० एक प्रकारच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली.
यावेळी फुलपाखरू अभ्यासक अजित चौहान व सचिन पाटील यांनी फुलपाखरांच्या विविध जाती, फुलपाखरांचे खाद्य, फुलपाखराचे पर्यावरणीय महत्त्व, फुलपाखरांचा जीवनक्रम इत्यादी अनेक विविध पैलूंवर आपल्या अनुभवांद्वारे प्रकाश टाकला. तसेच फुलपाखरूप्रेमी ओम धुत्तरगांवकर यांने सिद्धेश्वर वनविहारामध्ये टॉनी कॉस्टर प्रजातीच्या फुलपाखराचे होस्ट प्लांट आणि त्यांची अंडी शोधून त्याचे रेकॉर्ड आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
कार्यक्रमासाठी पर्यावरणप्रेमी अजित कोठारी यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. यावेळी त्यांनी प्लास्टिक प्लेट, ग्लास, चमचे टाळून सोलापूर प्लेट बँकेकडून पर्यावरणपूरक स्टीलची भांडी घेऊन वापरावीत असे आवाहन केले. या कार्यक्रमास सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महेश देवकर, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, मनोज देवकर तसेच पक्षीतज्ञ नरेंद्र गायकवाड, डब्ल्यूसीएएसचे संतोष धाकपाडे, दिपक करकी, प्रविण गावडे , विनय गोटे, महादेव डोंगरे, पर्यावरणप्रेमी अजित कोठारी, प्रणोती कोठारी, शिरीष गोळवणकर इ. उपस्थित होते. या उपक्रमास प्रादेशिक वनविभागाचे सहा. वनसंरक्षक अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे यांचे सहकार्य लाभले.
















Leave a Reply