0
Views

409 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर
माधुरी हत्तीणीची घरवापसी
कोल्हापूर, दि. 11- तब्बल 409 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापूरकरांची जणू माहेरवाशीन असलेल्या माधुरी हत्तीणीची आज शुक्रवारी रात्री उशिरा गुजरातच्या वनातारामधून नांदणी मठात पुन्हा घरवापसी झाली आहे.
शिरोळ तालुक्यातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची श्रद्धास्थान असलेली महादेवी उर्फ माधुरी हत्तीण उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मंजुरीनंतर पुन्हा नांदणी मठात परतली आहे. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी उच्चस्तरीय समितीसमोर ऑनलाईन सुनावणी झाली. त्यामध्ये नांदणी मठ, महाराष्ट्र शासन आणि वनतारा प्रशासनाच्या वतीने मठात उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्ययावत सुविधांची माहिती समितीला देण्यात आली. या सुनावणीनंतर उच्चस्तरीय समितीने माधुरीला मठात नेण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर ॲनिमल ॲम्बुलन्स मधून 40 जणांच्या तज्ञ पथकासह तब्बल 1160 किलोमीटरचा प्रवास करून माधुरी हत्तीणीचे नांदणीत आगमन झाले. प्राणीतज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिची सार्वजनिक मिरवणूक न काढता अत्यंत शांततेच्या वातावरणात तिला तिच्या नांदणी मठातील नव्या निवासस्थानी नेण्यात आले.
28 जुलै 2025 रोजी झाली होती वनतारामध्ये दाखल
पेटाच्या कायद्यानुसार माधुरी हत्तीणीवर अन्याय होत आहे. तिला त्रास दिला जातोय यासारखे आरोप करत नांदणी मठातून ही हत्तीण 28 जुलै 2025 रोजी वनतारामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यावेळी नांदणी गाव हळहळून गेले होते. यानंतर अंबानी कुटुंबावर सोशल मीडियाद्वारे मोठी टिकेची झोड उठली होती. अनेकांनी तर जिओ सिम कार्डवर बहिष्कार घातला होता. आता वनताराकडून विशेष उपचार घेऊन माधुरी हत्तीण पुन्हा मठात परतली आहे.
माधुरीसाठी खास निवास व्यवस्था
वनताराच्या संयुक्त विद्यमाने माधुरी साठी नांदणी मठात खास निवासस्थान उभारण्यात आले आहे. माधुरीच्या पायांना टोचू नये म्हणून खाली रबर फ्लोटिंग करण्यात आले आहे. त्याचबरोबर वातानुकूलित मोठे पंखे, पिण्यासाठी पाण्याचा मोठा हौद तयार करण्यात आला आहे. 24 तास पशुवैद्य तैनात करण्यात आले आहेत. सुसज्ज दवाखाना उभारण्यात आला आहे. तिला परिसरात सहज चालता यावे यासाठी मऊ वाळू जमिनीवर अंथरण्यात आली आहे. तिच्यासाठी फळ भाजीपाला त्याचबरोबर पाण्यात विहार करण्यासाठी स्वतंत्र हौदही बांधण्यात आला आहे.
महिलांनी व्यक्त केला आनंद
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतल्याने गावातील महिलांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. एक मुलगी सासरी गेल्यानंतर परत माहेरी येताना जो आनंद होतो तो आनंद आम्हाला होत आहे अशा शब्दात नांदणीतील महिलांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.
















Leave a Reply