विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी घेतला  विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत कामकाजाचा आढावा


0
Views

विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी घेतला

विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत कामकाजाचा आढावा

सोलापूर, दि. 8 – विशेष सखोल पुनरीक्षण -२०२६ कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोग नियुक्त मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूर उत्तर तहसील कार्यालय तसेच सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रास भेट देऊन विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

 

उत्तर तहसील कार्यालयात विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून एसआयआर कामकाजाची माहिती घेतली. या कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी, मतदारांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक पुरावे, स्थलांतरित नागरिक, भारतीय नागरिकत्व तसेच जन्मतारखेच्या पुराव्यांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

विशेष सखोल पुनरीक्षण हे महत्त्वपूर्ण निवडणूक कामकाज असल्याने कोणत्याही प्रकारची टाळाटाळ अथवा गैरवर्तन न करता प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. तसेच सुनावणीचे काम निर्धारित वेळापत्रकानुसार त्याच दिवशी पूर्ण करावे आणि या संपूर्ण कामकाजाशी संबंधित कागदपत्रे व्यवस्थित व सुरक्षितपणे जतन करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

यावेळी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी विभागीय आयुक्तांना विशेष सखोल उत्तर तहसील कार्यालय येथे पुनरीक्षणाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.

 

यानंतर विभागीय आयुक्तांनी सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, शहर दक्षिण या मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेतला तसेच सिद्धेश्वर प्रशाला येथील मतदान केंद्रास भेट देऊन तेथील विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामकाजाची पाहणी केली.

 

यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन,अपर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, प्रांताधिकारी सदाशिव पडधुने, प्रांताधिकारी सुमित शिंदे, नगर प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, उपायुक्त संदीप कारंजे, तहसीलदार निलेश पाटील तसेच उत्तर विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *