0
Views

सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे
100% उद्दिष्ट पूर्ण करावे : जिल्हाधिकारी
राजकारण न्यूज डॉट कॉम
सोलापूर, दि. 31- जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगाम 2026-27 साठी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 2 हजार 858 कोटी असून माहे जून 2026 अखेर पर्यंत 1 हजार 650 कोटी इतके वाटप केलेले आहे, ते उद्दिष्टाच्या 57% आहे. परंतु प्रत्यक्ष खातेदारांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे सर्व बँकांनी पीक कर्ज रकमेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करत असताना खातेदारांची संख्या ही 75 टक्के असली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, बँक ऑफ इंडियाचे क्षत्रिय प्रबंधक मानस झा, आरबीआयचे राव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, सहाय्यक उपनिबंधक आबासाहेब गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, आरसेटीचे संचालक दीपक वडेवाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी तसेच जिल्हा सहकारी बँकेचे जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की, यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले पाहिजे. तसेच बँकांनी पीक कर्ज वाटप करत असताना रकमेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबरोबरच एकूण शेतकरी खातेदाराची संख्याही 75 टक्के पर्यंत असली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच पुढील त्रैमासिक बैठकीपूर्वी ही खातेदारांची संख्या 50% पर्यंत राहील याचे काटेकोरपणे नियोजन करावे. ज्या बँका पीक कर्जाच्या रकमेबरोबरच खातेदाराची संख्येचेही उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत अशा बँकाकडील शासकीय ठेवी काढून घेण्यात येतील व ज्या बँका उद्दिष्ट पूर्तता करतील अशा बँकांमध्ये त्या ठेवी हस्तांतरित करण्यात येतील याची बँकांनी नोंद घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व बँकांनी शासकीय योजनांची कर्ज प्रकरणे मंजूर केली पाहिजे तसेच रिजेक्ट करत असताना त्याचे नेमके कारण नमूद केले पाहिजे. बँकाच्या सर्व जिल्हा समन्वयक यांनी त्यांच्या बँकाच्या सर्व शाखांना याबाबतची माहिती परिपत्रक काढून तात्काळ द्यावी. ज्या बँकेच्या ब्रांच मधून कर्ज प्रकरण रिजेक्टचे कारण नमूद केले जाणार नाही अशा बँकाबाबत कठोर निर्णय घेण्यात येतील असे निर्देशही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्ज पुरवितेचे उद्दिष्ट पूर्तता केली पाहिजे. तसेच कमीत कमी खातेदारांना जास्तीत जास्त वित्त परवठा करण्यापेक्षा जास्तीत जास्त खातेदारांना वित्तपुरवठा करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचित केले.
बंधन बँक व करूर वैश्य बँक यांचा सर्व क्षेत्रात कमी कर्ज पुरवठा केलेला दिसून येत आहे. तसेच शासकीय योजनांना प्रकल्पांना पतपुरवठा करताना हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत असल्याने या दोन बँकांनी पुढील तळे मासिक बैठकीपूर्वी आपल्या वित्तपुरवठ्यात सुधारणा करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्याप्रमाणे आजच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीस अनुपस्थित असलेल्या संबंधित बँकांच जिल्हा समन्वयक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.
















Leave a Reply