0
Views

संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ ही ‘ मागणी
सोलापूर, दि. 5- शहरातील विविध रस्त्यांवर नियम व तांत्रिक निकष धाब्यावर बसवून उभारलेल्या अशास्त्रीय गतिरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून अनेक नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. या गंभीर प्रकारास जबाबदार असलेल्या महापालिका आयुक्त व संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधासह लागू कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अशास्त्रीय गतिरोधक कावरून अपघातात मरण पावलेल्या वारसांना दहा लाखाची तात्काळ आर्थिक मदत महानगरपालिकेने करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील सर्व धोकादायक गतिरोधकांचे तातडीने सर्वेक्षण करून अनावश्यक गतिरोधक हटवावेत किंवा नियमानुसार दुरुस्त करावेत शहरी भागामध्ये डांबरी गतिरोधक न करता फायबरचे नटबोल्ट असलेले पिवळे पट्टे असलेले गतिरोधक बसवावेत तसेच गतिरोधकांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार तातडीने थांबवला नाही, तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम, महिला शहराध्यक्ष सुनीता घंटे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, शहर संघटक सुलेमान पिरजादे, शहर सचिव अक्षय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश डोंगरे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोळी, सिद्धाराम मगे, सुयश कदम, शहर उपाध्यक्ष श्रीकांत भोसले, शहर कार्याध्यक्ष शुभम काजवे, शहर सचिव अक्षय कांबळे, राजाभाऊ गायगवळी, अजिंक्य काजळे, अभिषेक सस्ते आदी उपस्थित होते.















Leave a Reply