नवरात्र उत्सव काळात तीन दिवसाआड पाणी सोडा 


0
Views

नवरात्र उत्सव काळात तीन दिवसाआड पाणी सोडा 

सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव महामंडळाचे महापौरांना निवेदन

सोलापूर, दि. 5- येथील सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव महामंडळाच्या वतीने महापौर विनायक कोंड्याल यांना विविध मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले. विजयादशमीच्या दिवशी निघणाऱ्या पारंपारिक मिरवणुकीतील अडचणी दूर कराव्यात आणि नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात किमान तीन दिवसांआड पाणीपुरवठा करावा, अशी प्रमुख मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनात म्हंटले आहे की ​गेल्या ६० ते ७० वर्षांची परंपरा जपणाऱ्या या महामंडळाच्या वतीने विजयादशमीच्या (दसरा) पवित्र दिवशी पार्क मैदानावर असलेल्या शमीच्या झाडाला सीमोल्लंघनासाठी प्रदक्षिणा घातली जाते. यासाठी शहरातील मानाच्या ५ ते ७ श्री देवी देवालयांच्या काठ्या, पालखी, छबिना आणि सार्वजनिक मंडळांच्या श्री देवी मूर्तींसह वाजत-गाजत भव्य-दिव्य मिरवणूक शहरातील विविध मार्गांवरून काढली जाते.

 

या ऐतिहासिक व पारंपरिक मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या देवस्थान तसेच सार्वजनिक मंडळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व अडचणी सोडवण्यात याव्यात आणि मुख्यत्वे नवरात्रोत्सवाच्या दिवसांत नागरिकांची व भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरात कमीत कमी तीन दिवसांआड पाणी पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी महामंडळाच्या वतीने महापौरांकडे करण्यात आली.

 

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत महापौर विनायक कोंड्याल यांनी सहाय्यक आयुक्त विणा पवार यांच्यासमवेत महापालिका प्रशासनाला यावर तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

 

याप्रसंगी माजी उपमहापौर तथा ट्रस्टी दिलीप कोल्हे, उत्सव अध्यक्ष विजय पुकाळे, सचिव दत्तात्रय मेनकुदळे, मल्लिनाथ सोलापूरे, निलेश शिंदे, गणेश चिंचोळी, आशिष उपाध्ये यांच्यासह महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *