शक्तिदेवीच्या घटस्थापना पूजेसाठी  पालकमंत्री गोरे यांना नगरसेवकांचे संयुक्त निमंत्रण


0
Views

 

 

शक्तिदेवीच्या घटस्थापना पूजेसाठी 

पालकमंत्री गोरे यांना नगरसेवकांचे संयुक्त निमंत्रण

सोलापूर, दि. 5- मुंबई, रत्नागिरी, कोकण आणि पुणे परिसरात गणेशोत्सव ज्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो, त्याच धर्तीवर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून शक्तिदेवीचा जागर अवघ्या महाराष्ट्रात सोलापूरमध्ये विशेषत्वाने पाहायला मिळतो. सोलापूरच्या या भक्तिमय आणि पारंपरिक नवरात्र महोत्सवाची सुरुवात घटस्थापनेपासून होत असून, या निमित्ताने शक्ती देवीचे प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीस तसेच पूजेसाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहावे, यासाठी भाजप नगरसेवक किसन जाधव, विनोद भोसले आणि बिजू प्रधाने यांनी त्यांची पुणे विभागीय कार्यालय येथे सोमवारी संयुक्तरीत्या भेट घेऊन निमंत्रण दिले.

 

 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रासह परराज्यांतून लाखो भाविक सोलापूरमार्गे तुळजापूरकडे जातात. तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्तही मोठ्या संख्येने भाविक अनवाणी पायी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करतात. त्यामुळे सोलापूरचा शारदीय नवरात्र महोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता शक्ती, श्रद्धा आणि भक्तीच्या जागराचे प्रमुख केंद्र ठरतो. या पार्श्वभूमीवर घटस्थापनेच्या दिवशी पालकमंत्री गोरे यांनी उपस्थित राहून शक्तिदेवीच्या पूजेत सहभागी व्हावे, अशी विनंती नगरसेवकांनी केली.

 

या निमंत्रणाचा स्वीकार करत पालकमंत्री गोरे यांनी सोलापुरातील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. दरम्यान, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचीही किसन जाधव, विनोद भोसले आणि बिजू प्रधाने यांनी भेट घेतली. आगामी निवडणुकीसाठी त्यांना शुभेच्छा देत विजयासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे, अशा शुभेच्छाही यावेळी नगरसेवकांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *