दुष्काळाची पाहणी करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर


0
Views

दुष्काळाची पाहणी करण्यासाठी

खासदार प्रणिती शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर

मंगळवेढा, दि. 1-सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर, जंगलगी, जिंती, खवे, मरवडे, बावची, सलगर बु., येड्राव, भाळवणी, निंबोणी, रेड्डे, भोसे, नंदेश्वर, जुनोनी, खुपसुंगी, पाटखळ येथे काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाण्याअभावी करपून गेलेली पिके, झालेले मोठे नुकसान, वाढता शेतीखर्च आणि कित्येक महिन्यांची मेहनत मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट त्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतले.

 

यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पावसाची अनिश्चितता, वाढता शेतीखर्च, पीक विम्याची रक्कम, पिण्याच्या पाण्याची समस्या, जनावरांसाठी चारा आणि शासनाकडून अपेक्षित मदत याबाबतच्या अडचणी प्रणिती शिंदे यांच्यासमोर मांडल्या. खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

 

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, दुष्काळ जाहीर करून केवळ शासन निर्णय काढून प्रश्न सुटणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष मदत मिळणे आवश्यक आहे. करपलेल्या ज्वारी, मका, बाजरी, तूर, ऊस, भुईमूग, द्राक्षबागा यांसह सर्व नुकसानग्रस्त पिकांची सरसकट नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.

 

पीक विमा कंपन्यांनी नुकसानीची १०० टक्के नोंद करून पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन तात्काळ चारा डेपो सुरू करावेत, आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करावेत आणि पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

दुष्काळग्रस्त भागात भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित पाणीपुरवठा यंत्रणांशी समन्वय साधून आतापासूनच योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सरकारने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेल्या कर्जमाफीचा सोलापूर जिल्ह्यातील केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून उर्वरित शेतकरी अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, नुकसानभरपाई आणि पीक विम्याचा लाभ तातडीने द्यावा, अशी मागणी प्रणिती शिंदे यांनी केली.

 

 

  • शेतकरी हा देशाचा कणा आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आज शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर दिसणारे हे वास्तव केवळ पाहून थांबायचे नाही, तर त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे ही आमची भूमिका आहे. शेतकऱ्यांना योग्य आणि तातडीची मदत मिळेपर्यंत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाकडे सातत्याने आवाज उठवत राहू, असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी दिला.

 

यावेळी तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, सुरेश कोळेकर बजरंग चौगुले, भाळवणी चे सरपंच लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग चौगुले, विनायक माळी, नवनाथ ढगे, सचिन तटाळे, कांतीलाल ताटे, उमेश काटकर, अण्णासाहेब खडतरे, बन्सीलाल खडतरे, अलकराया पुजारी, अण्णासाहेब शिरसागर, सिद्धू चौगुले, शिवदास पुजारी, दामाजी सलगर, भाऊसो जाधव, कल्याण गवळी, आबा पाटील, नामदेव डांगे, शशिकांत सावंत यांच्यासह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *