काँग्रेसकडून सायकल यात्रेचे सोलापुरात स्वागत 


0
Views

काँग्रेसकडून सायकल यात्रेचे सोलापुरात स्वागत 

सोलापूर, दि. 24 – उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपूर पोस्ट, हरपूर गावचे रहिवासी सोनू यादव यांनी ‘काँग्रेस जनसंदेश जनसंपर्क क्रांती सायकल मिशन-२०२९’ या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाची विचारधारा, मूल्ये आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा सोलापुरात दाखल झाल्यानंतर काँग्रेसकडून सायकल यात्रेचे स्वागत करण्यात आले.

 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विचारांना पाठिंबा व्यक्त करणे तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पवित्र आदर्श, तत्त्वे आणि मूल्यांचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करणे, हा या सायकल यात्रेचा उद्देश आहे. हैदराबाद येथील गांधी भवन, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयातून हिरवा झेंडा दाखवून सोनू यादव यांच्या सायकल यात्रेला सुरुवात करण्यात आली.

 

ही यात्रा तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली अशा पाच राज्यांतून मार्गक्रमण करीत दिल्ली येथे पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान काँग्रेस पक्षाची विचारधारा, राहुलजी गांधीजींचे विचार, संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि जनहिताच्या धोरणांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सोनू यादव करीत आहेत.

 

सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या हस्ते सोनू यादव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सायकल यात्रेच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक सहकार्य करण्यात आले.

 

यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, दाऊद नदाफ, संजय गायकवाड, भीमराव शिंदे, सुभाष वाघमारे, पांडुरंग पुठ्ठा, विवेक कन्ना, धीरज खंदारे, नागेश म्याकल, सचिन सुरवसे, सोपान थोरात, राजू निलगंटी, शंकर गायकवाड , अभिलाष अच्युगटला आदी उपस्थित होते.

 

याप्रसंगी चेतन नरोटे यांनी सोनू यादव यांच्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारा व तत्त्वांचा प्रचार-प्रसार करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. जनतेपर्यंत काँग्रेसचे विचार पोहोचविण्यासाठी त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम प्रेरणादायी असून, त्यांच्या सायकल यात्रेची यशस्वी पूर्तता व्हावी, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनीही सोनू यादव यांच्या उपक्रमाचे स्वागत करून, सायकल यात्रेद्वारे विविध राज्यांतील जनतेशी संवाद साधत काँग्रेसचा, राहुलजी गांधी यांचा जनसंदेश पोहोचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.

 

काँग्रेस पक्षाच्या विचारांना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही सायकल यात्रा सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहाने स्वागत केली. सोनू यादव यांच्या पुढील प्रवासासाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

 

काँग्रेसचा विचार, संविधानाची मूल्ये आणि जनतेचा आवाज घेऊन ही सायकल यात्रा दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *