0
Views

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
राज्याचे विशेष अधिवेशन बोलवा
आमदार रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. 20- राज्यातील गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान मंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आमदार रोहित पवार आपल्या पत्रात म्हणतात की महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेसमोर दुष्काळामुळे निर्माण झालेली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यंदाच्या अपुऱ्या आणि असमान पावसामुळे अनेक भागांमध्ये खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या हातातील उभे पीक उध्वस्त झाले आहे. वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा वाढता बोजा, चारा-पाण्याची संभाव्य टंचाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम या सर्व प्रश्नांकडे तातडीने पाहण्याची आवश्यकता आहे. देशाचे जेष्ठ नेते माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना यासाठी आपणास विस्तृत पत्र लिहीत शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची मदत, शेतमजुरांना किमान 25 हजार रुपये मदत यासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
दुष्काळ हा केवळ सरकारचा विषय नाही तसेच केवळ सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधकांचा विषय नाही. हा महाराष्ट्रातील कोट्यवधी शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे या संकटावर पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. कर्नाटक राज्य सरकारने दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. महाराष्ट्र सरकारने देखील केवळ प्रशासकीय बैठका आणि जिल्हानिहाय पाहणी पुरते मर्यादित न राहता दुष्काळावर स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलावून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून शेतकरी आणि ग्रामीण जनतेला सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे हा स्पष्ट संदेश देणे गरजेचे आहे. तरी आपण महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावून त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामीण जनतेसाठी ठोस, कालबद्ध आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम उपाययोजनांची घोषणा करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान एकीकडे राज्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना तसेच शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असताना विरोधकांकडून दुष्काळावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून दुष्काळाविषयी हवी तितकी संवेदनशीलता दाखविली जात नसल्याचे दिसून येत आहे. आता विरोधी पक्षांकडून दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली जात आहे ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितपत मनावर घेतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.















Leave a Reply