0
Views

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्वत
नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख
मंद्रूप येथे शेतकऱ्यांशी संवाद
सोलापूर, दि. 28- दर चार-पाच वर्षांनी निर्माण होणार्या दुष्काळी परिस्थितीचा केवळ तात्पुरता सामना करून चालणार नाही. पाऊस कमी झाला तर पुढे काय?’ याचे उत्तर आजपासून शोधले पाहिजे. दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्वत नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
मंद्रूप (दक्षिण सोलापूर) येथे शेतकरी बांधवांशी संवाद साधताना आ. देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकर्यांच्या विविध अडचणी जाणून घेत भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी दूरदृष्टीने नियोजन करण्यावर भर दिला. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊस पिकाची वाढ, पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा तसेच उपलब्ध पाणीसाठा जूनपर्यंत पुरविण्याचे आव्हान आहे. शेततळी, जलसंधारण आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची बचत व साठवणूक करण्याबरोबरच पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे आणि शेतीसाठी काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याचे आ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा व पाण्याची शाश्वत व्यवस्था करण्याची गरज असून, शेतकर्यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. तसेच शासकीय मदत थेट शेतकर्यांच्या खात्यावर मिळावी, पीक विमा आणि दुष्काळी परिस्थितीतील विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकर्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जनावरांच्या छावणी ऐवजी
चारा उपलब्ध करून द्या
यावेळी जनावरांना छावणीत एकत्र ठेवण्याऐवजी चारा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी स्वतःच्या जनावरांची व्यवस्था करू शकतात, अशी भूमिका काही शेतकर्यांनी मांडली. त्यावर मोठ्या संख्येने जनावरे एकत्र ठेवल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, त्यामुळे या मागणीचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. आपला तालुका पाणी, शेती, शिक्षण, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत सक्षम झाला पाहिजे, हा आपला संकल्प आहे, असेही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षण आणि रोजगारावरही भर द्यावा
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि रोजगार हेही महत्त्वाचे विषय आहेत. प्रत्येक मराठी शाळा दर्जेदार झाली पाहिजे. शिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे कौशल्य, शिक्षणाचा दर्जा आणि आवश्यक सुविधा यावर सातत्याने काम झाले पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांना उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे, असे आ. देशमुख यांनी सांगितले. स्थानिक उद्योगधंदे आणि शेतीपूरक व्यवसाय वाढविणे, शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच महिला आणि युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला.















Leave a Reply