बंद पडलेली मोफत डायलेसिस सेवा पुन्हा सुरू

बंद पडलेली मोफत डायलेसिस सेवा पुन्हा सुरू

खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी

सोलापूर, दि. 20- सोलापूर जिल्हा रुग्णालयातील, तसेच मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील महाडायलेसिस योजनेंतर्गत किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरू असलेली मोफत डायलेसिस सेवा अचानक बंद केली होती. सेवा पुरविणाऱ्या मे. एचएलएल लाईफ केअर लि. या कंपनीला सेवांची बिले मिळाली नसल्याने ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली होती. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील, तसेच मंगळवेढा तालुक्यातील डायलेसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय झाली होती.

 

या संदर्भात रुग्णांच्या नातेवाइकांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. याची तातडीने दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून बंद पडलेली मोफत डायलेसिस सेवा त्वरित पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती.

 

खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर यांनी संबंधित कंपनीच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधून डायलेसिस सेवा विनाखंड सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार मे. एचएलएल लाईफ केअर लि. या कंपनीने डायलेसिस सेवा पुन्हा सुरू केली आहे. यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील, तसेच मंगळवेढा तालुक्यातील डायलेसिस रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान, आज खासदार प्रणिती शिंदे यांनी गुरुनानक चौक येथील सोलापूर जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी तसेच उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून सेवा पुन्हा सुरू झाली आहे का, रुग्णांना कोणत्या अडचणी येत आहेत आणि आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध आहे का, याबाबत सविस्तर माहिती घेतली.

 

यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना सांगितले की, डायलेसिससाठी आवश्यक असलेली औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे. सेवा पुरविणाऱ्या कंपनीची थकीत बिले तातडीने अदा करावीत. आर्थिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे भविष्यात ही सेवा पुन्हा बंद पडता कामा नये. रुग्णांना उपचारांअभावी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.

 

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाडायलेसिस योजनेंतर्गत किडनीच्या आजाराने ग्रस्त रुग्णांना मोफत डायलेसिस सेवा दिली जाते. मात्र, कंपनीची देयके प्रलंबित राहिल्याने ही सेवा बंद पडल्याचा प्रकार समोर आला होता. खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून केलेल्या पाठपुराव्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू झाली असून, रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

 

रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये कोणताही खंड पडू नये आणि गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *