सोलापूरकरांना रोज पाणी देण्याच्या दिशेने मोठे पाऊल;
1,350 कोटींच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी
सोलापूर, दि. 25- सोलापूर शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीतील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सुमारे 1,350 कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र राज्याच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. शहराला नियमित आणि 24 तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली होती. त्यांच्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दिशेने आता महत्त्वाचे पाऊल पडले असून, योजनेला मान्यता मिळाल्याने प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत जागतिक बँकेच्या सहाय्याने शहरात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दोन नवीन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच 30 नवीन जलकुंभ, सुमारे 1,227 किलोमीटर लांबीचे अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे आणि सुमारे 2 लाख 38 हजार नवीन पाणी जोडण्या मीटरसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शहरातील पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार असून, जुन्या वितरण व्यवस्थेचेही आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेत सुमारे 80 कोटी रुपयांच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात सुमारे 20 ते 30 टक्क्यांपर्यंत बचत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेच्या संचालनावरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार देवेंद्र कोठे यांचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अभिनंदन केले. योजनेच्या मार्गातील विविध अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, उच्चाधिकार समितीची मान्यता मिळणे हा त्या प्रयत्नांचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. सुधारित पाणीपुरवठा योजनेला मिळालेल्या मंजुरीमुळे सोलापूर शहरातील नागरिकांना नियमित आणि सक्षम पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने मोठी आशा निर्माण झाली आहे.















Leave a Reply