
लोकमंगल फाउंडेशनच्या लोटस योजनेतून
३१ विद्यार्थ्यांना ७ लाख ६९ हजारांची शिष्यवृत्ती
सोलापूर, दि. 24- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने लोटस योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात एकूण ३१ विद्यार्थ्यांना ७ लाख ६९ हजार ८२५ रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.
लोटस योजनेची सुरुवात २०१५ साली करण्यात आली. गेल्या ११ वर्षांत या योजनेच्या माध्यमातून एकूण २४२ विद्यार्थ्यांना तब्बल ९६ लाख ५५ हजार ३४० रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना पदवी शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरवर्षी आर्थिक सहाय्य केले जाते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.
लोटस योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च शिक्षण घेऊन खासगी तसेच शासकीय क्षेत्रात उच्च पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांच्या यशामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व सामाजिक विकासालाही हातभार लागला आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी आणि त्यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देणारी लोकमंगल फाउंडेशनची लोटस योजना अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा आधार ठरत आहे.
याप्रसंगी लोटस कोअर कमिटीचे विलास मोरे, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक जयवंत थोरात, नगरसेवक सत्यजित वाघमोडे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.














Leave a Reply