0
Views

खासदार ज्योती वाघमारे
गुजरात अभ्यास दौऱ्यात सहभागी होणार
सोलापूर, दि. 19- सोलापूरच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय या विषयाशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या सदस्या म्हणून गुजरात राज्यातील अभ्यासदौऱ्यात सहभागी होणार आहेत.
राज्यसभा सचिवालयाच्या १७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, संसदीय स्थायी समितीचा गुजरात अभ्यासदौरा २१ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात केवडिया, अहमदाबाद आणि भुज या ठिकाणांना समिती भेट देणार आहे. या भेटीदरम्यान संबंधित विषयांशी निगडित प्रशासकीय व्यवस्था, कामकाजाची पद्धत तसेच प्रत्यक्ष कार्यप्रणालीचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. संसदीय स्थायी समित्यांना केंद्र शासनाच्या विविध मंत्रालये व विभागांच्या कामकाजाचा अभ्यास करून त्यासंदर्भातील निरीक्षणे, अहवाल आणि शिफारशी संसदेसमोर मांडण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. अशा महत्त्वाच्या समितीच्या सदस्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा गुजरात अभ्यासदौऱ्यातील सहभाग त्यांच्या संसदीय कार्यातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. राज्यसभेतील आपल्या अभ्यासपूर्ण सहभागातून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी सोलापूरचे प्रश्न तसेच विविध सामाजिक विषय राष्ट्रीय पटलावर मांडण्याची आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभ्यासू व्यक्तिमत्त्व, विषयाची सखोल जाण आणि संसदीय कामकाजातील सक्रिय सहभागामुळे त्यांच्याकडे प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून पाहिले जात आहे. सोलापूरच्या एका सामान्य कुटुंबातील लेकीला देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महत्त्वाच्या संसदीय समितीत काम करण्याची मिळालेली संधी ही सोलापूरकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब ठरत आहे.
मिळालेल्या संधीचे नक्कीच
सोने करेन : खा. ज्योती वाघमारे
या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्या म्हणाल्या, सामान्य कुटुंबातील एका लेकीला देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महत्त्वाच्या संसदीय समितीत सहभागी होण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही संधी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन व पाठबळ मोलाचे ठरले आहे. त्यांनी एका सामान्य बहिणीवर दाखविलेला विश्वास मी कायम सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करेन. त्यांच्या मार्गदर्शनाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मिळालेल्या या संधीचे नक्कीच सोने करेन आणि माझ्यावर सोपविलेली संसदीय जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेन, असे खासदार ज्योती वाघमारे यांनी सांगितले.















Leave a Reply