सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे कुलगुरूंना निवेदन


0
Views

सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे कुलगुरूंना निवेदन

​सोलापूर, दि. १६- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ या लोकप्रिय खेळाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना आज बुधवारी सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत लोंढे यांनी निवेदन दिले.

 

​यावेळी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा जिल्हा नेटबॉल संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, सिनेट मेंबर अजितकुमार सांगवे, सोलापूर जिल्हा नेटबॉल संघटनेचे चेअरमन एम. शफी, सचिव कुद्दूस शेख, उपाध्यक्ष विठ्ठल कुंभार, सहसचिव जुबेर शेख, खजिनदार तलहा शेख तसेच अब्दुल्ला चौधरी, मोईन सय्यद आदी उपस्थित होते.​

 

 

निवेदनात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, नाशिक, नांदेड, नागपूर आणि गोंदिया यांसारख्या विद्यापीठांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये ‘नेटबॉल’ खेळाचा आधीच समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात सन २००७ पासून या खेळाची सुरुवात झाली आहे. आजघडीला सोलापूर शहरासह मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माळशिरस, अक्कलकोट आणि मोहोळ या तालुक्यांमध्येही नेटबॉल खेळाची मैदाने व सक्षम संघ उपलब्ध आहेत.

 

 

राष्ट्रीय व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश

​शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये हा खेळ २०१२ पासून अनुदानित खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध वयोगटांत (१४, १७, १९ वर्षे) चमकदार कामगिरी केली असून, अनेकदा राज्यस्तरावर संघ उपविजेता ठरला आहे. खेळाडूंच्या या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यापीठ स्तरावरही या खेळाला हक्क मिळणे गरजेचे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

 

 

गुणवान खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळणार

​सध्या विद्यापीठात नेटबॉलचा समावेश नसल्यामुळे येथील प्रतिभावान खेळाडूंना इतर विद्यापीठांकडे वळावे लागते. विद्यापीठातच हा खेळ सुरू झाल्यास स्थानिक खेळाडूंना उत्तम संधी मिळेल आणि त्यांचा ओघ बाहेर जाण्याऐवजी विद्यापीठाच्या संघास बळकटी येईल. तसेच थेट ‘ऑल इंडिया विद्यापीठ नेटबॉल स्पर्धेत’ सोलापूरच्या खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यानुसार सन २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात या खेळाचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हा संघटनेतर्फे विद्यापीठाला संपूर्ण तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *