सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीची नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट


0
Views

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीची नॅशनल स्पर्धेत

तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट

सोलापूर, दि. 12- मध्यप्रदेशातील इंदौर येथे दि. ७ ते १२ सप्टेंबर २०२६ दरम्यान झालेल्या ४२ व्या सब-ज्युनियर व ५२ व्या ज्युनियर नॅशनल एक्वेटिक चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सोलापूरची युवा डायव्हिंगपटू श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने आपल्या अफाट कामगिरीने इतिहास रचला आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना श्रावणीने या राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदके पटकावत दिमाखदार ‘गोल्डन पंच’ साधला. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने ‘डायव्हिंग गर्ल्स चॅम्पियन ट्रॉफी’ पटकावत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला.

 

श्रावणीने ८ सप्टेंबर रोजी १ मीटर स्प्रिंगबोर्ड प्रकारात १३८.०० गुणांसह सुवर्णपदक पटकावत आपल्या विजयी मोहिमेला सुरुवात केली. त्याच दिवशी हायबोर्ड सिंक्रोमध्ये मनस्वी माने हिच्या साथीने २५६.८५ गुणासह दुसरे सुवर्णपदक मिळवले. ९ सप्टेंबर रोजी ३ मीटर सिंक्रोमध्ये श्रावणी व मनस्वी माने या जोडीने १६९.६५ गुणांसह प्रतिस्पर्ध्यांवर मात करत महाराष्ट्रासाठी तिसरे सुवर्णपदक मिळवले. १० सप्टेंबर रोजी ३ मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये श्रावणीने पुन्हा अव्वल कामगिरी करत २८४.४० गुणांसह चौथे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

 

स्पर्धेच्या अंतिम दिवशी हायबोर्ड प्रकारातही श्रावणीने सुवर्ण कामगिरीची परंपरा कायम ठेवत २८४.९० गुणांसह पाचवे सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे एका राष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकण्याचा अभूतपूर्व पराक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला.

 

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

श्रावणीच्या या पाच सुवर्णपदकांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राने डायव्हिंग गर्ल्स चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. वैयक्तिक पदकांची लयलूट आणि महाराष्ट्राला मिळवून दिलेली सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी यामुळे श्रावणीच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

श्रीकांत शेटे यांच्या प्रशिक्षणाचा ठसा

श्रावणीच्या या ऐतिहासिक यशामागे तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मोलाचे योगदान आहे. शिस्तबद्ध, कडक आणि शास्त्रोक्त प्रशिक्षणातून त्यांनी श्रावणीला डायव्हिंगमधील अत्यंत कठीण तांत्रिक बारकावे आत्मसात करून दिले. सातत्यपूर्ण सराव, अचूक तंत्र आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्रावणीने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

 

सोलापूरच्या या कन्येने पाच सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई करत महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून, तिच्या ‘गोल्डन पंच’मुळे क्रीडाक्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *