साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान सोलापूर,


0
Views

साहित्य सेवा संघाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ डॉ. शंकर नवले यांना प्रदान

सोलापूर, दि. 8- साहित्य सेवा संघ, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगावचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांना प्रदान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांच्या हस्ते महाविद्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात डॉ. नवले यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. शंकर नवले यांनी हा पुरस्कार सहकुटुंब स्वीकारला.

 

‘माऊलीची कुशी’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे होते. ज्येष्ठ कवी व लेखक प्रदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साहित्य सेवा संघाचे अध्यक्ष दत्तात्रय इंगळे (आलूरकर), सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी डॉ. शंकर नवले यांनी केलेले प्रयत्न, महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या बदलत्या गरजांनुसार सक्षम करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.

 

प्राचार्य म्हणून कार्यरत असताना डॉ. नवले यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील तांत्रिक कौशल्ये, नवोपक्रमाची वृत्ती, संशोधनाची आवड आणि व्यावसायिक क्षमता विकसित करण्यावर भर दिला. उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्याधारित शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांना चालना देण्यात आली.

 

 

प्राचार्य डॉ. शंकर नवले यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगावचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *