0
Views

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना एलआयसी
गोल्डन ज्युबिली फाउंडेशन देणार शिष्यवृत्ती
सोलापूर, दि. 10- उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना एलआयसी गोल्डन जुबिली फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
2023 -24, 2024 -25 किंवा 2025- 26 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, डिप्लोमा किंवा समक्ष परीक्षा किमान 60% किंवा समतुल्य सीजीपीए ग्रेड सह उत्तीर्ण झालेल्या आणि शैक्षणिक वर्ष 2026 -27 मध्ये पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्ती घोषित करताना एलआयसी गोल्डन जुबिली फाउंडेशनला आनंद होत असल्याचे फाउंडेशनने म्हटले आहे.
फाउंडेशनकडून सामान्य शिष्यवृत्ती आणि विशेष शिष्यवृत्ती अशा दोन प्रकारात शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सामान्य शिष्यवृत्ती इयत्ता बारावी किंवा डिप्लोमा नंतर मुला मुलींसाठी मेडिसिन, अभियांत्रिकी, डिप्लोमा, व्यावसायिक अभ्यासक्रम, कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकात्मिक कोर्सेस या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्यांना दिली जाणार आहे. तर विशेष शिष्यवृत्तीमध्ये इयत्ता दहावी किंवा डिप्लोमा नंतर मुला मुलींसाठी इयत्ता अकरावी व बारावी, 10+2 पद्धती अंतर्गत इंटरमिजिएट डिप्लोमा व्यवसायिक अभ्यासक्रम किंवा एकात्मिक कोर्सेस या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज, इतर पात्रता, अटी आणि योजनेच्या सविस्तर माहितीसाठी https:/licindia.in या संकेतस्थळावरील गोल्डन जुबिली फाउंडेशन पेजचा संदर्भ घ्यावा. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2026 ही आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलद्वारे माहिती देण्यात येणार असल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.















Leave a Reply