बैलपोळा निमित्त ॲनिमल राहत संस्थेचे  बैल मालकांना भावनिक आवाहन 


0
Views

बैलपोळा निमित्त ॲनिमल राहत संस्थेचे 

बैल मालकांना भावनिक आवाहन 

सोलापूर, दि. 7- येत्या 10 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र बैल पोळा हा सण साजरा केला जाणार आहे. हा सण प्रामुख्याने श्रावण अमावस्याच्या पिठोरी दिवशी साजरा केला जातो. यानिमित्त ॲनिमल राहत संस्थेने सर्व बैल मालकांना भावनिक आवाहन केले आहे.

 

ॲनिमल राहत संस्था म्हणते की बैलपोळा हा सण महाराष्ट्रात बैलांसाठी महत्वाचा मानला जातो. गावोगावी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होतो. पूर्वी बैलपोळा सण नैसर्गिक पद्धतीने साजरा केला जायचा पण काळाच्या ओघात बैलपोळा साजरा करण्याची पद्धत बदलत गेली आहे. शेतकऱ्यांकडून बैल सुंदर दिसण्यासाठी त्यांची शिंगे तासने, शिंगाणा आणि शरीरावर रासायनिक रंग लावणे, त्यांना डॉल्बी समोर मिरवणुकीत तासनतास उभे करणे असे प्रकार केले जातात. जे की अत्यंत चुकीचे आहेत. अशा पद्धती मुळे बैलांना वेळवेगळे त्रास आणि आजार होतात. ते टाळण्यासाठी ॲनिमल राहतने बैलांच्या मालकांना आवाहन केले आहे की बैलांना सजवताना किंवा उत्सव साजरा करताना त्यांना शारीरिक त्रास होऊ देऊ नये. शिंगे तासु नका, रासायनिक रंग लावू नका. बैलांना सजवण्यासाठी शरीरावर रासायनिक रंग लावू नका. जबरदस्तीने मोठ्या आवाजात डॉल्बी-डीजे समोर उभे करू नका.

 

हे सर्व प्रकार बैलांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी अत्यंत घातक आहेत.वरील सर्व प्रकार बैलांसोबत केल्यामुळे त्याच्या डोळ्यातून वारंवार पाणी येणे, डोळ्यांचा आणि शिंगाचा कर्क रोग होऊ शकतो म्हणून असे आजार आणि बैलांना होणारा त्रास टाळण्यासाठी शिंगे तासु नका त्याऐवजी रंगीत रेबिन वापरा. बैलांना रासायनिक रंग न लावता नैसर्गिक फुलांनी सजवावे. डॉल्बीच्या मोठ्या आवाजा समोर उभे करणे टाळा. बैलांना जबरदस्तीने नाचवू नका. शांत वातावरणात उत्सव साजरा करा. महत्वाचे म्हणजे त्यांना भरपूर आराम द्या. पुरेसा आहार व पाणी उपलब्ध करून द्या. वेसण ऐवजी म्होरकी वापरा. दोन दाव्या ऐवजी एक दाव वापरा. बैल आणि इतर जनावरांना दररोज खरारा करा.

 

बैलांवर अन्याय करू नका  : डॉ. आकाश जाधव 

ॲनिमल राहतचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आकाश जाधव यांनी बैलपोळा सण बैलांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या बाबत कृतज्ञता’ ‘आभार’ व्यक्त करण्यासाठी असतो, बैलांना अनैसर्गिक शिक्षा करण्यासाठी नसतो त्यामुळे बैल पोळा साजरा करताना बैलांवर अन्याय होणार नाही असा साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

 

बैलांच्या मोफत तपासणीसाठी संपर्क साधा 

ॲनिमल राहत संस्था ही सोलापूर, पंढरपूर येथे बैलांप्रति प्रेमभावना वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवत आहे. इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या बैलांच्या तपासणी व मोफत उपचारासाठी संस्था मदत करत आहे. अधिक माहितीसाठी ॲनिमल राहत सोलापूर (मो. 9552552048) ॲनिमल राहत पंढरपूर (मो. 9552552049) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *