0
Views

लेंडकी नाल्याची तातडीने साफसफाई करा
सुरेश पाटील यांची मागणी
सोलापूर, दि. 2- प्रभाग क्र. ३ मधील घोगडे वस्ती, कुंभार वेस परिसरातून जाणाऱ्या लेंडकी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व घाण साचली आहे. कुंभार वेस शॉपिंग सेंटरखाली घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिक, व्यापारी व दुकानदारांना ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून काही व्यापाऱ्यांना उलट्या-जुलाबासह आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे लेंडकी नाल्याची तातडीने साफसफाई करून मृत जनावरांची विल्हेवाट लावावी व औषध फवारणी करण्याची मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी मनपा आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आपल्या निवेदनात सुरेश पाटील म्हणतात की मुनाळे बोळ व गणेशनगर परिसरातील लेंडकी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, गवत, काटेरी झाडे-झुडपे वाढली आहेत. नाल्यात कुत्रा अडकून पडल्याची घटना घडली असून, परिसरात घुशी, उंदीर, मुंगूस व इतर प्राण्यांचा वावर वाढला आहे. याशिवाय नाल्यामध्ये गाय वासराचा मृत्यू झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी निर्माण झाली आहे. मृत गाय वासरू तसेच त्यांची हाडे व अवशेष काही ठिकाणी रस्त्यावर टाकले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मृत जनावर तातडीने तेथून हटवून त्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात यावी. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित ही अत्यंत गंभीर बाब असून पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी व खातेप्रमुख जबाबदार राहतील. त्यामुळे आपण संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश देऊन लेंडकी नाल्याची संपूर्ण साफसफाई, गाळ व कचरा काढणे, गवत-काटेरी झाडे व झुडपे हटविणे, मृत जनावरांची तातडीने विल्हेवाट लावणे तसेच संपूर्ण परिसरात जंतुनाशक, कीटकनाशक व डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.















Leave a Reply