
पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धेत
मणिपाल विद्यापीठ, जयपूरला विजेतेपद
सोलापूर, दि. १८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि भारतीय विद्यापीठ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७ चा समारोप बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूरच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. शिवाजी विद्यापीठाने द्वितीय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा होते. यावेळी स्पर्धेचे आयोजन सचिव तथा विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अतुल लकडे, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सहसचिव राजीव देसाई, स्पर्धेचे निरीक्षक तथा चाणक्य विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. हेमंत एन. व्ही., विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिकारी, प्राध्यापक, प्रशिक्षक, पंच आणि खेळाडू उपस्थित होते.
डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. गेल्या चार दिवसांमध्ये विविध विद्यापीठांच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. खेळाडूंनी कौशल्य, मेहनत, शिस्त आणि क्रीडाभावनेच्या जोरावर स्पर्धेत रंगत निर्माण केली, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेचे निरीक्षक डॉ. हेमंत एन. व्ही. यांनी स्पर्धेतील सामने, खेळाडूंची कामगिरी आणि आयोजनाबाबतचा आपला अनुभव व्यक्त केला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन, आयोजन समिती, क्रीडा विभाग, पंच, प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. मणिपाल विद्यापीठ, जयपूरच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाचा संघ उपविजेता ठरला, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय आणि यजमान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने चतुर्थ क्रमांक मिळविला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी विजय-पराजयाचा विचार न करता खेळभावना, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर पुढील क्रीडा कारकिर्दीत यश संपादन करावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास डॉ अभिजीत जगताप, डॉ समर्थ मनुकर, डॉ दत्तात्रय बिराजदार, श्री मकरंद भुजबळ, कु जोशना मदने, कु तेजल कुलकर्णी, अजित कुमार संगवे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भासके अंबादास यांनी केले. तर प्रा. बाळासाहेब वाघचवरे यांनी आभार मानले.















Leave a Reply