सोलापूरचा बुद्धिबळपटू विरेश शरणार्थीची
आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी
सोलापूर, दि. 8- सोलापूरचा प्रतिभावान बुद्धिबळपटू विरेश दयानंद शरणार्थी याने अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत अहमदाबाद व चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या दोन प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्याने या दोन स्पर्धांमध्ये दोन ग्रँडमास्टर नॉर्म्स मिळविण्याची विलक्षण कामगिरी केली आहे. तसेच वीरेशचा भाऊ श्लोक शरणार्थी याने देखील उल्लेखनीय कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय वरिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.
चेन्नई येथील बुद्धिबळ स्पर्धेतून आज सोलापुरात परतलेल्या वीरेश,श्लोक व त्यांना नेहमीच पाठबळ देणारे त्यांचे आई वडील दयानंद व शुभांगी शरणार्थी यांचे सोलापूर रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले.
सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन, चॅम्प चेस स्कूल, सोलापूर चेस अकॅडमी आणि नेक्स्ट मुव्ह चॅम्पियन्स चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्वागत व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूर चेस ॲकॅडमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, वीरेश व श्लोकचे प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक व पंच सुमुख गायकवाड, राष्ट्रीय वरिष्ठ पंच उदय वगरे, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी, राष्ट्रीय पंच संतोष पाटील, नामवंत खेळाडू व प्रशिक्षक गोपाळ राठोड, सुभाष उपासे, डॉ. आनंद कुदळे, शिवानंद चिनगुंडे, वीरेशचे काका सिद्धाराम शरणार्थी, सोमा शरणार्थी, सचिन धवन, गिरीश हातवळणे, सचिन धवन,आनंद कुदळे, सुभाष उपासे, सोमा शरणार्थी, प्रज्वल कोरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वराली हातवळणे, मानस गायकवाड, रिद्धी उपासे, दीक्षा कुलकर्णी, सृष्टी गायकवाड, ओम चिनगुंडे,श्रेयस कुदळे, पार्थ हातवळणे, समर्थ शरणार्थी, कौस्तुभ वगरे, स्वरा वगरे, स्पृहा वगरे, प्रथित गायकवाड आदी खेळाडू, पालक, नातेवाईक व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहमदाबाद येथे झालेल्या पश्चिम आशियाई ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत विरशने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकाविले. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब प्राप्त केला, तसेच कारकिर्दीतील पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळविण्याचा मानही संपादन केला.
या यशानंतर लगेचच चेन्नई येथे आयोजित ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. या स्पर्धेतही सातत्यपूर्ण आणि दर्जेदार खेळ करत पाचवा क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत त्याने कारकिर्दीतील दुसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून आपल्या आंतरराष्ट्रीय यशात आणखी एक मानाचा टप्पा गाठला. अंतिम फेरीत चुरशीच्या झालेल्या लढतीत वीरेशने ग्रँडमास्टर लियोन मेनडोका याचा धक्कादायकरीत्या पराभव करत नऊ पैकी साडेसहा गुण मिळत ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असणाऱ्या निकष पूर्ण केला व स्पर्धेत पाचवा क्रमांक व रोख चार लाखाचे पारितोषिक पटकाविले.
विरेशने अवघ्या २० दिवसात दोन मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग, एक सुवर्णपदक, आंतरराष्ट्रीय मास्टर किताब आणि दोन ग्रँडमास्टर नॉर्म्स अशी देदीप्यमान कामगिरी केली आहे.
विरेशच्या या यशामुळे त्याच्या ग्रँडमास्टर किताबाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीला मोठी गती मिळाली असून, सोलापूरच्या बुद्धिबळ क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे.
वीरेश व श्लोकला सोलापूरचे सुमुख गायकवाड, उदय वगरे तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक मेजर ध्यानचंद अवॉर्ड विजिते ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रघुनंदन गोखले, आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख तसेच चोला चेस अकॅडमीचे ग्रँडमास्टर आर. बी. रमेश यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.
वीरेश व श्लोक या दोन्ही युवा बुद्धिबळपटूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेचे आधारस्तंभ अशोक जैन, महाराष्ट्रचे अध्यक्ष परिणयजी फुके, सचिव निरंजन गोडबोले, सिद्धार्थ मयूर, गिरीश चितळे, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक शशिकांत मक्तेदार, भरत चौगुले, विलास म्हात्रे, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, दिपाली सातपुते यांनी कौतुक करत पुढील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.















Leave a Reply