
सोलापूर विद्यापीठात पश्चिम विभागीय
पुरुष लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन
सोलापूर, दि. 15- क्रीडा क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी जिद्द, चिकाटी, शिस्त आणि खिलाडूवृत्ती आवश्यक असून, खेळाडूंनी या गुणांच्या बळावर आपली क्रीडा कारकीर्द घडवावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सहसचिव राजीव देसाई यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि भारतीय विद्यापीठ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७ चा उद्घाटन समारंभ विद्यापीठ परिसरात उत्साहात पार पडला. ही स्पर्धा १५ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणार असून, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांतील विविध विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या उद्घाटन समारंभास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक आणि स्पर्धेचे आयोजन सचिव डॉ. अतुल लकडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सहसचिव राजीव देसाई, भारतीय विद्यापीठ संघाचे नियुक्त निरीक्षक व प्रादेशिक क्रीडा स्पर्धा संचालक, चाणक्य विद्यापीठाचे हेमंत एन. व्ही., तेजल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. अतुल लकडे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. विद्यापीठांमधील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे, गुणवंत खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय स्तरावर क्रीडा उत्कृष्टतेला चालना देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हेमंत एन. व्ही. यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळामध्ये शिस्त, सातत्य, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले. तर अध्यक्षीय भाषणात डॉ. अतुल लकडे यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देऊन स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जाहीर केले.
लॉन टेनिस हा एकाग्रता, संयम, वेग आणि निर्णयक्षमता यांची कसोटी पाहणारा खेळ आहे. खेळाडूंनी विजय-पराजयाचा विचार न करता प्रामाणिकपणे खेळावे, स्पर्धेच्या नियमांचे पालन करावे आणि आपल्या विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. समर्थ मनुकर, डॉ. प्रशांत ताबिले, डॉ. मल्लीकअर्जुन पाटील, डॉ. दत्तात्रे बिराजदार, डॉ. श्री विशाल होनमाने, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजन समितीच्या वतीने बाळासाहेब वाघचावरे यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि सहभागी खेळाडूंचे आभार मानले.















Leave a Reply