0
Views

सागवानी लाकडापासून बनविलेला नंदीबैल
8 लाखांचा नंदीबैल वेधतोय लक्ष
नागपूर, दि. 10- नागपूर आणि विदर्भाच्या परिसरात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा हा सण साजरा केला जातो. यानिमित्त लहान मुलांसाठी लाकडी नंदीबैल तयार केले जातात. गेल्या दोनशे वर्षांपासून ही परंपरा नागपूर मध्ये सुरू आहे ती आजही चालूच आहे. हा सण साजरा होत असताना नागपूरच्या लकडगंज परिसरात टमटममध्ये ठेवून विक्रीस आणलेला 8 फूट लांबीचा लाकडी सागवानापासून बनवलेला तब्बल 8 लाख रुपये किमतीचा नंदीबैल सध्या चर्चेत आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेल्या या बैलाविषयी जाणून घेऊया …
आष्टी येथील रवींद्र मोकद्दम यांनी हा 7.5 फूट उंचीचा आणि 8 फूट लांब हा नंदीबैल तयार केला आहे. मोकद्दम सांगतात की ते गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ लाकडी नंदीबैल बनविण्याच्या व्यवसायात आहे. आतापर्यंत मी चार फुटांपर्यंत नंदी बनवले आहेत. हा बनवलेला आतापर्यंतचा माझा सर्वात मोठा नंदीबैल आहे. सध्या जिवंत बैलांची संख्या कमी होत आहे. पुढच्या पिढीला बैल कसा असतो याची माहिती व्हावी म्हणून हा नंदीबैल मी लाकडापासून तयार केला आहे. हा नंदीबैल तयार करण्यासाठी दोघांना सहा महिन्यांचा कालावधी लागला आहे. नंदीबैल बनविण्यासाठी लागणारे लाकूड हे सागवानाचे असून त्याची किंमत अंदाजे दोन लाख रुपयांपर्यंत आहे. हा नंदीबैल पूर्णपणे आतून पोकळ आहे त्यामुळे याचा वापर मंदिरात दानपेटी साठी म्हणून देखील करता येतो. त्याचबरोबर दुसरे काहीही त्यामध्ये ठेवता व काढता येते. शेतातील धान्य देखील ठेवता येऊ शकते. एक माणूस झोपू शकेल इतकी जागा यामध्ये आहे.
कोरीव आकर्षक नंदीबैल
हा नंदीबैल अत्यंत कोरीव व आकर्षक बनविण्यात आला असून त्याच्याकडे पाहिले तर तो जिवंत असल्याचा भास होतो. येथून येणारे जाणारे लोक नंदी पुढे उभे राहून सेल्फी काढत आहेत. त्याचबरोबर रवींद्र यांच्या कलेचे कौतुक देखील करत आहेत. प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असलेल्या व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नंदीबैलाची विक्रीसाठीची किंमत सुमारे 8 लाख रुपये इतकी ठेवली आहे. 7 लाख रुपयांपर्यंत ग्राहकाने मागितल्यास आपण तो देऊ असेही रवींद्र यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.















Leave a Reply