
ऊस दरावरून राजू शेट्टी यांचा बेमुदत
रेल रोको, राष्ट्रीय महामार्ग बंदचा इशारा
सोलापूर, दि. 18- उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता होणारी सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराच्या तोडग्याची बैठक कारखानदार यांच्या सांगण्यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून अचानक आज बुधवारी रात्री ९.०० वाजता घेण्यात आली आहे. आज रात्री निर्णय न झाल्यास उद्या सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर बेमुदत रेल रोको व सोलापूर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलन सुरू करायचे आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोशल मीडियाद्वारे दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दर जाहिर करण्याच्या मागणीसाठी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. बैठकीत ऊस दराचा तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यानंतर रात्री दोन वाजता प्रशासनाने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजता बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तोपर्यंत ऊस तोड बंद ठेवण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान बैठक उद्या होणार असताना अचानक आज रात्रीच घेण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. कारखानदारांच्या सांगण्यावरून ही बैठक अचानक आज घेण्यात येणार असल्यामुळे राजू शेट्टी यांनी या बैठकीत ऊस दराचा तोडगा न निघाल्यास रेल रोको व राष्ट्रीय महामार्ग बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. स्वतः चा फायदा करून घेण्यासाठी साखर कारखानदार शेतकऱ्यांना अपेक्षित ऊस दर देण्यासाठी चाल ढकल करत आहेत. त्यामुळे संघटना व शेतकऱ्यांमध्ये कारखानदारांप्रती तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आजच्या बैठकीत ऊस दराचा निर्णय न झाल्यास हा प्रश्न आणखी चिघळू शकतो. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Leave a Reply