0
Views

सोलापूर : मनसेने प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
मनसेचा शिक्षण विभागाला 24 तासांचा अल्टिमेटम
सोलापूर, दि. 1- सोलापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. पक्षाचे सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शिक्षण विभाग तसेच शासनाला 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत प्रशस्त ॲपच्या माध्यमातून राज्यातील प्राथमिक शाळातील शिक्षकांना संवेदनशीलता प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशस्त ॲपद्वारे दहा व्हिडिओ दाखविले जात आहेत. हे सर्व व्हिडिओ मराठी भाषे व्यतिरिक्त दाखविले जात असून शिक्षण क्षेत्रातील ही बेशिस्त आणि दुराग्रह वृत्ती मराठी भाषेला दुय्यम स्थान देण्याच्या उद्देशाने राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात करणे आणि राज्यातील मराठी भाषा संपुष्टात आणणे तसेच मराठी शाळा बंद पाडणे हा शासनाचा कुटील डाव आहे. हा डाव मनसे कदापिही शक्य होऊ देणार नाही.
मराठी ही केवळ एक भाषा नाही ती आमची ओळख आहे. राज्यातील शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषेमध्ये शिक्षण देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. ती स्वीकारून येत्या 24 तासात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आणि प्रशासनाने प्रशस्त ॲपच्या माध्यमातून दाखविण्यात येणारे सर्व व्हिडिओ मराठी भाषेमध्येच दाखविले जावेत अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना गोविंद बंदपट्टे, विठ्ठल बंडा, मल्लिनाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.














Leave a Reply