0
Views

शेतकऱ्याला करोडपती करणाऱ्या
बैलाच्या निधनाने मावळात शोककळा
पुणे, दि. 1- शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून बैलाकडे पाहिले जाते. आता यांत्रिकीकरणाच्या युगात बैलांचे महत्व जरी कमी झाले असले तरी ज्याच्या दारात सर्जा-राजाची जोडी तो शेतकरी खरा श्रीमंत मानला जातो. मात्र, एका बैलाने आपल्या वेगाने आपल्या मालकाला अक्षरश: कोट्यधीश केले. तो बैल विषबाधेने मेल्यानंतर त्या शेतकऱ्याचा उजवा हात तुटल्यासारखे झाले. तसेच बैलाच्या मृत्यूनंतर तो शेतकरी व त्याचे कुटुंबीय घरातील सदस्य गेल्याप्रमाणे हमसून हमसून रडले. हे दृश्य पाहणारे देखील गहिवरून गेले.
ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील मावळ येथील. शेतकऱ्याला कोट्यधीश करणाऱ्या त्या बैलाचे नाव आहे ओम्या तर त्याच्या शेतकऱ्याचे नाव आहे रामनाथ वारिंगे. त्यांनी 2016-17 साली जालन्यातून मैसूर जातीचा हा बैल विकत घेतला. त्याचे नाव ठेवले ओम्या. ओम्याने शेतात रामनाथ वारिंगे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून राबण्याबरोबरच बैलगाडा शर्यतीत कोट्यवधी रुपयांची बक्षिसेही मिळवून दिली. ओम्याने तब्बल दहा वर्षे मावळात आपले राज्य केले. त्याने जणू प्रत्येक शर्यत आपल्या मालकाला जिंकून दिली. त्यामुळे तो परिसरात सर्वांचा लाडका झाला होता.
या ओम्या बैलाने आपल्या वेगाने मालकाला मालामाल करताना तब्बल सहा-सात थार गाड्या, दोन स्कॉर्पिओ, दोन ते तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, अगणित दुचाकी, चांदीची गदा आणि असंख्य ट्रॉफी असा बक्षिसांचा पाऊस पाडला. या ओम्या बैलाचे नुकतेच म्हणजे २७ ऑगस्ट रोजी निधन झाले आणि त्याचे मालक रामनाथ वारिंगे अक्षरश: दु:खात बुडाले.
ओम्याचा खुराक
ओम्या बैलाने आपल्या वेगाने आपल्या मालकाला केवळ श्रीमंतच बनविले नाही तर परिसरात नवीन ओळखही मिळवून दिली. ओम्याची निगा राखण्यासाठी त्याला विशेष खुराक दिला जायचा. उडीद डाळ, शेंगदाण्याची पेंड, खारीक, तूप, अंडी, बदाम असा पौष्टिक आहार त्याला दिला जायचा. मालकाकडून विशेष काळजी घेतली जात असल्यामुळे ओम्याने देखील मालकाला कधी पराभूत होऊ दिले नाही.
27 ऑगस्टला ‘काय ‘ घडलं?
27 ऑगस्टला नेहमीप्रमाणे ओम्या बैलाने पाणी पिले. काही वेळ तो निवांत बसला होता. त्यानंतर तो शिंगाने माती उकरू लागला. मात्र, अर्ध्या तासाच्या आतच त्याची परिस्थिती बदलली. ओम्या अचानक निपचित पडला. त्याची जीभ बाहेर आली होती, दात हलत होते. घाबरलेल्या शेतकऱ्याने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर विषारी दंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर ओम्याचे मालक असलेले शेतकरी रामनाथ वारिंगे हे आपल्या जीवापाड जपलेला ओम्या या जगात नाही राहिला हे पाहून ओम्याच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडू लागले. त्यांना सावरणे देखील कठीण झाले होते. या घटनेवरून असे दिसते की मुका जीव जसा शेतकऱ्याला जीव लावतो तसाच शेतकरी देखील त्या मुक्या जीवाला आपल्या घरातील एक सदस्य मानूनच त्याची काळजी घेत असतो.
















Leave a Reply