
मृतांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्या
खासदार शिंदे यांची प्रांताधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा
पंढरपूर, दि. 16- सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील मौजे आंबे येथे दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी शेतातील विहिरीच्या खोदकामादरम्यान अचानक माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रांताधिकारी सचिन इताफे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली.
या दुर्घटनेत मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे (रा. रांजणी), तानाजी घोडके आणि आबा घोडके (रा. अनवली) या चार कामगारांना आपला जीव गमवावा लागला. हे सर्व कामगार मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे चारही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबातील कर्त्या व्यक्तींच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. तसेच, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. संबंधित कामगारांच्या कुटुंबीयांना या मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून त्यांना आर्थिक आधार द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र देऊन संबंधित कुटुंबीयांना जास्तीत जास्त शासकीय आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.
या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके आणि आबा घोडके या चारही कामगारांना खासदार प्रणिती शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
या दुःखद प्रसंगी संबंधित कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत आणि आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली.















Leave a Reply