0
Views

सोलापूर, दि. 26-
हुलजंती व आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन हुलजंती येथील आर टी ओ चेकपोस्ट सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली.
ग्रामस्थांच्या निवेदनाची तातडीने दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांना पत्र पाठवून चेकपोस्टचे तात्काळ स्थलांतर करण्याबाबत तसेच परिसरातील शाळांबाहेर गतिरोधक बसविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली.
मौजे हुलजंती, ता. मंगळवेढा येथील आरटी ओ चेकपोस्ट सध्या गाव व शाळेच्या जवळच्या परिसरात असल्याने नागरिक, शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि भाविकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थ्यांची दैनंदिन ये-जा सुरू असते. तसेच हुलजंती येथील श्री महालिंगराया तीर्थक्षेत्र असल्याने पंढरपूरकडे तसेच कर्नाटकातून ये-जा करणाऱ्या भाविकांची आणि वाहनांचीही मोठी वर्दळ या मार्गावर असते.
आर टी ओ चेकपोस्ट परिसरात आतापर्यंत तीन ते चार अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी निवेदनातून दिली असून, या अपघातांमध्ये दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. अनेकदा जड वाहने चेकपोस्ट टाळण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात वाहतुकीची गर्दी, कोंडी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी चेकपोस्टचे योग्य ठिकाणी स्थलांतर करणे अत्यावश्यक असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.
तसेच आर टी ओ चेकपोस्टपासून विजयपूरकडे सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर दोन हायस्कूल असून, पंढरपूरकडे जाणाऱ्या मार्गावर एक जिल्हा परिषद शाळा व एक हायस्कूल आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करीत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चेकपोस्ट परिसरातील शाळांबाहेर गतिरोधक बसविण्याचीही मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
हुलजंती, येळगी, आसबेवाडी, शिवणगी, सोड्डीसह परिसरातील ग्रामस्थांना चेकपोस्टमुळे होणारा त्रास आणि वाढता अपघातांचा धोका लक्षात घेऊन, गाव व शाळेच्या परिसरापासून दूर, वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा योग्य व सुरक्षित ठिकाणी आर टी ओ चेकपोस्टचा पॉईंट तात्काळ स्थलांतरित करावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली. तसेच या संदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. रविकिरण कोळेकर, मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, युवा नेते शिवाजी पडवळे, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, विकास चोपडे, मलकारी कोटे, बिराप्पा बंडगर, रवी सोमुत्ते, भारत कांबळे, मारुती केंगार, यश थोरवत, चंद्रकांत घोडके, ज्ञानेश्वर हेकडे, यासिन हुजरे, उमेश हुजरे, शाम खुटेकर, शाम हेकडे, मल्लसिद्ध कोळी, महेश पेटर्गे, बबलू चव्हाण, लकेश चव्हाण, मारुती घेडके, राजाराम घोडके, मल्लसिद्ध खुटेकर, रमेश हुजरे, अण्णा सोड्डी यांच्यासह हुलजंती, येळगी, आसबेवाडी, शिवणगी, सोड्डी आदी गावांतील युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Reply