विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांचे यशस्वी रेस्क्यू 

विहिरीत पडलेल्या दोन घोणस सापांचे यशस्वी रेस्क्यू 

सोलापूर, दि. 13- मुस्ती, ता. द. सोलापूर येथील शेतकरी चंद्रकांत कळके यांच्या विहिरीमध्ये पडलेल्या दोन घोणस सापांना वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांनी यशस्वी रेस्क्यू करून त्यांना पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.

 

 

12 नोव्हे. 2026 रोजी सकाळी 11 वाजता मुस्ती, ता. द. सोलापूर येथील शेतकरी चंद्रकांत कळके यांच्या विहिरीमध्ये गेल्या महिन्यात एक तर गत आठवड्यात आणखी एक साप पडल्याची माहिती वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशन संस्थेच्या सदस्यांना मिळाली. या अनुषंगाने वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे सदस्य सहकाऱ्यासमवेत सोलापूरहुन 25 ते 30 किमी अंतर असलेल्या मुस्ती गावाकडे रेस्क्यू करण्यासाठी रवाना झाले. त्याठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना 70 ते 80 फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये दोन घोणस जातीचे साधारण तीन फुट लांबीचे विषारी साप आढळून आले. त्या विहिरीला कठडे तर नव्हतेच आणि विहिरीत जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे विहिरीत उतरता येणे शक्य नव्हते. कुठलीही साधनसामग्री सोबत नसताना शेतकरी कळके यांच्याकडून एक ड्रीपचा लांब पाईप व प्लास्टिकचे कॅरेट मागवण्यात आले. त्या कॅरेटला दोन्ही बाजूंनी ड्रीपचा पाईप बांधून विहिरीत अलगद सोडण्यात आले व पहिल्या प्रयत्नातच एक घोणस साप त्या कॅरेटमध्ये रेस्क्यू झाला. त्याच कल्पकतेने दुसरा साप रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला परंतु तो साप घाबरून विहिरीतल्या कडेकपाऱ्यात लपून बसत होता व काही केल्या त्या कॅरेटमध्ये येत नव्हता. अथक परिश्रमानंतर संस्थेचे सदस्य अजय हिरेमठ यांनी कमरेला दोरी बांधून स्वतः विहीरीत उतरून त्यांनी एका स्नेक स्टिकच्या सह्याने अथक परिश्रमानंतर त्या घोणस प्रजातीच्या विषारी सापाला विहीरीतून यशस्वीपणे कॅरेटमध्ये रेस्क्यू केले. यानंतर सर्वांनी सुटकेचा निस्वास टाकला. कारण संध्याकाळ झाली होती, दिवस मावळत होता, प्रकाशाची कमतरता जाणवत होती. हा रेस्क्यू झाल्यानंतर या दोन्ही सापांना लगेच जवळच त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पुन्हा सोडून देण्यात आले.

 

या बचावकार्यासाठी वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनचे अजित चौहान, संतोष धाकपाडे, विनय गोटे, अजय हिरेमठ, तसेच येथील शेतकरी सिद्धाराम कळके, चंद्रकांत कळके व इतर शेतकरी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *