बाजार समितीतून दिवसाढवळ्या  शेतकऱ्यांच्या कांद्याची चोरी 

बाजार समितीतून दिवसाढवळ्या 

शेतकऱ्यांच्या कांद्याची चोरी 

सोलापूर, दि. 4- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतकऱ्यांचा कांदा चोरून नेला जात असल्याचे सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे. यामुळे कांदा चोरीचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

 

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल चोरी होण्याची ही पहिली घटना नाही. दररोजच शेतकऱ्यांचा माल चोरीला जातो. हे रोखण्यासाठी बाजार समितीचे पदाधिकारी व अधिकारी सपशेल अपयशी ठरत आहेत. कारण दिवसा ढवळ्या पाच ते सहा महिला एका मुलाला हाताशी धरून बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला कांदा बिना दिक्कतपणे चोरून नेत आहेत. त्यांना रोखणारे कोणीही नाही. चोरी होत असताना बाजार समितीचे सुरक्षा रक्षक काय करत होते हा महत्वाचा प्रश्न आहे. दुसरीकडे बाजार समितीचे सभापती आणि पदाधिकारी पहाटे अचानक येऊन पाहणी करतात. त्यानंतर त्यांची सगळीकडे वाहवा होते. पण दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांच्या मालावर दरोडा पडत असेल तर तुमच्या अचानक भेटी देण्याला शून्य किंमत आहे. तुम्ही फक्त प्रसिद्धी आणि दिखाव्यासाठी असले स्टंट करत आहात असे स्पष्ट होते. जर सभापती आणि पदाधिकाऱ्यांना खरोखरच शेतकऱ्यांविषयी कळवळा असेल तर त्यांनी अशा घटना कायमच्या रोखाव्यात. शेतमालाला आणि शेतकऱ्यांना सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

 

चोरांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करा 

सध्या दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना त्याने पीकविलेल्या कांद्यावर अशा पद्धतीने जर दिवसाढवळ्या दरोडा पडत असेल तर याची जबाबदारी कोण घेणार व त्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई कोण देणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर अशा घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधित चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोलीसांकडून कारवाई केली जावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *